NIA Investigation On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वच स्तरातून होतेय. या पार्श्वभूमीवर तपासाच्या दिशेने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर बैसरनमधील स्थानिकांचे, पर्यटकांचे जबाब नोंदवले जातायत. तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणी असणाऱ्या मोबाईल्स कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स, फोटोज लक्षपूर्वक तपासले जातायत. एनआयएच्या तपासातून मोठी माहिती उघड झाल्याचं बोललं जातंय. या माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणा लवकरच दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतील, असं आता सांगितलं जातंय. पहलगाम हल्ल्यातील तपासात नक्की कोणते पुरावे हाती लागलेत, आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा झालाय हेच जाणून घेऊयात...
मंगळवार दि. २२ एप्रिलला दुपारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि संपूर्ण देश हादरला. आज या हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झालाय. या कालावधीत देशांतर्गत हालचाली वाढल्या. दिवसागणिक या हल्ल्याबाबत नवनवीन खुलासे समोर येतायत. सध्या सुरक्षा यंत्रणांचा कसून तपास सुरु आहे. माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ४ दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. तसेच त्यांच्याजवळ एके-47 आणि एम-4 सारख्या अत्याधुनिक रायफल्स असल्याचेही तपासातून समोर आलंय. तसेच घटनास्थळावरून या रायफल्सची काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. माहितीनुसार, हे दहशतवादी घनदाट जंगलातून २२ तास पायी चालत बैसरनच्या मैदानी भागात पोहोचले होते, असा दावा केला जातोय. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी ३ नागरिक पाकिस्तानातील होते. तर एक दहशतवादी आदिल ठोकर हा तिथला स्थानिक आहे. ज्याचं घर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बुलडोजरने पाडून जमिनदोस्त केलं होतं. या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी दोन जणांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले, यातील एक फोन हा पर्यटकाचा होता. तर एक फोन हा स्थानिक नागरिकाचा असल्याचे बोललं जात आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार,जेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होता, तेव्हा तिथल्या एका स्थानिक फोटोग्राफरने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यावेळी तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला होता. त्यामुळे हा व्हिडीओ तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पहलगाम हल्ल्यात आता बैसरन खोऱ्यात घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचे देखील जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी घोडा, खेचर सुविधा पुरविणारे तसंच बाईकर्सना देखील चौकशीसाठी बोलावलं आहे. हल्ल्या बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हे जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. या घटनेचे इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातायत. यात भारतीय लष्कराच्या एका लेफ्टनंट कर्नलचाही समावेश आहे. जे घटनास्थळी उपस्थित होते.
दरम्यान, हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरल्याची माहिती एनआयएच्या तपासातून उघड झाल्याची मिळतेय. दहशतवाद्यांनी वापरलेला हा चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन हा हुआवेई (Huawei) या कंपनीचा होता. हा सॅटेलाईट फोन ट्रॅक झाल्याची माहिती आहे. तर भारतात हुआवेई कंपनीच्या चिनी बनावटीचा सॅटेलाईट फोन वापरण्यास बंदी आहे. दरम्यान, पाकिस्तान मधूनच या फोनची भारतात तस्करी झाल्याचा एनआयएला संशय असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या आयएसआय कडून वापर केला जात आहे. भारतातील टोल नाक्यांवर फोन करून भारतीय लष्कराची माहिती घेतली जात आहे. लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली? याची विचारपूस करण्यात आलेली असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील टोल नाक्यांना आयएसआयचे फोन, व्हिडीओ आल्याचं समजलं आहे. भारतीय फोन नंबरचा वापर करून ही माहिती काढून घेण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानकडून अश्या कुरापती केली जात असल्याचं उघड झाले आहे.
हल्ल्यानंतर एका पर्यटकाचा झिपलाइनिंग करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत दहशतवादी पळून जाणाऱ्या लोकांवर अचूकपणे गोळीबार करताना दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, दहशतवाद्यांना विशेष लष्करी प्रशिक्षण मिळाले होते. खरंतर, एक पर्यटक येथे झिपलाइन करत होता आणि यादरम्यान तो स्वतःचा व्हिडिओ देखील बनवत होता. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक पळून जात आहेत आणि दहशतवादी त्यांना लक्ष्य करत आहेत हे दिसून येते आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये "अल्लाहू अकबर" घोषणा देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा बोलावले आहे, अशी माहिती आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पर्यटकांसह स्थानिक लोकांची एनआयएच्या वतीने चौकशी केली जात आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये जप्त केलेल्या ड्रग्सचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचं एनआयएने म्हंटलं आहे. या ड्रग्सच्या व्यापारातून लष्कर-ए-तैयबाला आर्थिक रसद पुरवली गेली असल्याचं देखील एनआयएने म्हंटलं आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या हरप्रीतसिंग तलवारच्या जामिनाला एनआयएने विरोध केला आहे. गुजरातमध्ये जप्त केलेले २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे थेट संबंध असल्याचं एनआयएने कोर्टात म्हंटले आहे.
तसेच या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी हाशिम मूसा याचा हात असल्याचे तपासातून समोर आले आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे. असून, सध्या तो लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेसाठी काम करत आहे. या हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला असून भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.रिपोर्टनुसार, हाशिम मुसा, जो आता लष्कर-ए-तैयबासोबत काम करत आहे. हाशिम मुसाला जम्मू आणि काश्मीरला पाठवण्यापूर्वी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने (SSG) विशेष प्रशिक्षण दिले होते. तपास अधिका-याचे म्हणणे आहे की, मुसावर भारतीय आणि परदेशी पर्यटक तसेच स्थानिक नसलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे काम सोपवण्यात आले होते. इतकंच नाहीतर मुसाचा आयएसआयशी थेट संबंध असून त्यांच्या सूचनेवरूनच तो लष्कर ए तैय्यबामध्ये सामील झाला होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. हाती लागलेल्या या सगळ्या माहिती आणि पुराव्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद्यांचा माग काढण्यात यश मिळेल, असे बोलले जात आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\