महाराष्ट्राची ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने
29-Apr-2025
Total Views | 7
मुंबई, राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹५७,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.
महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅट, निवे येथे १२०० मेगावॅट आणि येथे वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत