नवी दिल्ली : (India Slams Pakistan at UN) संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी व्हिक्टिम्स ऑफ टेररिजम असोसिएशन नेटवर्क अर्थात VOTAN या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भातील बैठकीत पाकिस्तानला चांगलं फैलावर घेतले. भारताविरुद्ध प्रचार आणि निराधार आरोप पसरवण्यासाठी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले.
काय म्हणाल्या योजना पटेल?
"दहशतवादी कृत्ये गुन्हेगारी आणि अन्याय्य आहेत, त्यांचा हेतू काहीही असो. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निःसंशयपणे निषेध केला पाहिजे. दहशतवादी कारवायांचे सूत्रधार, या कारवायांना आर्थिक मदत करणारे आणि अशा कारवायांचे कर्तेधर्ते यांना दोषी मानून त्यांना कठोर शासन व्हायला हवे. दहशतवादी कृत्ये ही गुन्हेगारी स्वरूपाची व असमर्थनीय असतात. मग त्यामागे त्यांचा उद्देश काहीही असो किंवा ती कधीही, कुठेही आणि कुणीही केलेली असोत", असंही योजना पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या जगभरातल्या देशांचे यावेळी योजना पटेल यांनी आभार मानले. "आंतरराष्ट्रीय समुदायाची दहशतवादासंदर्भातली कठोर भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर सर्वाधिक संख्येनं सामान्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा कारवायांनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर व समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची भारताला पूर्ण कल्पना आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल", असंही योजना पटेल यांनी नमूद केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\