काँग्रेसी मानसिकता पाकिस्तानशी मिळती जुळती! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
29-Apr-2025
Total Views | 13
मुंबई : काँग्रेसी मानसिकता ही पाकिस्तानशी अगदी मिळती जुळती आहे, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून येत असलेल्या विविध प्रतिक्रियांचा त्यांनी मंगळवार, २९ एप्रिल रोजी जोरदार समाचार घेतला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "काँग्रेसी मानसिकता ही पाकिस्तानशी अगदी मिळती जुळती आहे. तिकडे पाकिस्तानी नेता चौधरी फवाद हुसेनने सर तन से जुदा असा प्रधानमंत्री मोदींविरूध्द नारा दिला, तर इकडे काँग्रेसने तसा फोटो एडिट करून त्यांच्या अधिकृत सोशल हॅन्डल्सवर टाकला. पहलगामच्या हल्ल्याबाबत काँग्रेस आणि त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मोदीजी हे एकच टारगेट आहे."
"दहशतवादी हिंदू नरसंहारावर बोलण्याऐवजी राजकीय खेळी खेळत जनतेची दिशाभूल करण्यात काँग्रेसी नेते मश्गुल झालेत. त्यात आपल्याकडच्या वडेट्टीवारांचीही वर्णी लागते. तिकडे त्या कर्नाटकातले काँग्रेसी मुख्यमंत्रीदेखील युध्द नको वगैरे बरळले तेव्हा आमच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध वर्तवला. त्यावेळी त्यांच्याविरूध्द घोषणा दिल्या. सिध्दरामय्यांना यांना त्याचा इतका राग आला की, पाकिस्तानविरूध्द अहिंसेची भूमिका घेणाऱ्या सिध्दरामय्यांनी त्यांच्या सभेत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर व्यासपीठावरच हात उचलला," असे त्या म्हणाल्या.
भारतीयांच्या रक्ताची काहीच किंमत नाही का?
"आज त्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा एकजुटीने या परिस्थितीशी सामना करण्याऐवजी तुम्ही पाकिस्तानची बाजू धरुन लावताय? तुम्हाला इथेसुध्दा तुष्टीकरणाचं राजकारण आणि वोट बँक दिसावी यासारखी दुर्देवी बाब कोणती? निष्पाप भारतीयांचे रक्त केवळ ते हिंदू आहेत म्हणून वाहिले. त्या रक्ताची तुमच्या लेखी काहीच किंमत नाही का?" असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.