जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचार-वचनांसाठी आयुष्यभर कार्य करण्याचा संकल्प करणारे प्रा. गजानन धरणे यांच्याविषयी...
70चे दशक होते. भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळला होता. मात्र, या कठीण काळातही सुगलाबाई यांनी भाकरी केली की, पहिली भाकरी गावातल्या विरक्ती मठात भक्तिभावाने देत असत. आपल्याला भाकरी मिळत नाही, अशा परिस्थितीमध्येही आई भाकरी मठामध्ये का देते? या विचाराने त्यांच्या लहान मुलाला राग यायचा. त्या बालकाने रागाने आईला प्रश्न विचारला, “अव्वा, आपल्याला पोटभर खायला भाकरी नाही. पण, तू भाकरी केलीस की पहिली एक भाकरी मठामध्ये देतेस.” तेव्हा आई म्हणाली, “आपण ज्या समाजात जन्मतो, त्या समाजाचे आपल्यावर ऋण असतात. त्यामुळे आपल्या घरी तयार झालेल्या पहिल्या भाकरीवर समाजाचा हक्क आहे. त्यामुळे पहिली भाकरी मठात द्यायलाच हवी.” ‘अन्न दासो’ हा संस्कार त्या बालकावर झाला. गरिबी असली म्हणून काय झाले? आपल्या अर्ध्या भाकरीतली अर्धी भाकर समाजाला द्यायलाच हवी, या संस्कारात घडलेले हे बालक पुढे, प्रा. गजानन रेवणसिद्ध धरणे म्हणून समाजात नावारूपाला आले.
प्रा. गजानन हे आज ‘श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर’ या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. तसेच, ‘सोलापूर जनता बँके’चे संचालक असून, ‘श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ’ सोलापूरचे कार्यकारिणी सदस्य आहेत. ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर’ अंतर्गत ‘श्री महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रा’च्या सल्लागार समितीचेही ते सदस्य आहेत.
महात्मा बसवेश्वरांच्या वचनामध्ये सांगितलेली करुणा, हे प्रा. गजानन धरणे यांच्या जीवनाचे सूत्र आहे. त्यामुळेच त्यांनी समरस मानवी मूल्याचा उद्घोष करणार्या समाजासाठी, ‘समरसता मंचा’मध्ये काम केले. तसेच ‘भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान’चे सहकार्यवाह, कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. या सगळ्या काळात हिंदू समाज एकच आहे, हा विश्वास त्यांच्या मनात दृढ होता.
धाराशिवच्या नंदगाव तालुक्यातील लिंगायत समाजाचे रेवणसिद्ध आणि सुगलाबाई यांना सात अपत्ये होती. रेवणसिद्ध हे शेतकरी होते, तर सुगलाबाई अत्यंत सुसंस्कारी धर्मनिष्ठ गृहिणी. धरणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच. बालपणापासून गजानन हे गुरे राखणे, धरणबांधणीच्या कामामध्ये मजुरी करणे हे काम करत. प्रचंड कष्ट करावे लागतात, याबद्दल त्यांना कधीही वाईट वाटले नाही. कारण, त्यांच्या आईने महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या श्रमप्रतिष्ठेचे संस्कार मुलांना दिले होते.
गजानन हे हुशार विद्यार्थी होते. मात्र, इयत्ता नववीमध्ये शिकत असतानाच त्यांच्या बाबांना देवाज्ञा झाली. घरातला कर्ता पुरुष गेला आणि त्यांच्या मोठ्या भावाने, शंकरराव यांनी घरची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळेच पुढे शिक्षणासाठी गजानन सोलापूर येथे आले. येथेच त्यांचा संपर्क ‘अभाविप’ आणि त्यातूनच शामसुंदर जाजू यांच्याशी झाला. त्यानंतर गजानन हे ‘राष्ट्र प्रथम’ या विचारांसाठी कार्य करू लागले. ‘अभाविप’च्या विविध पदांची जबाबदारी पार पाडत, त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
पुढे गजानन महाविद्यायात नोकरीला लागले. त्यानंतर ‘एमई इंजिनिअरिंग’चे शिक्षणही, त्यांनी पूर्ण केले. प्रत्येक आव्हानावर ते संघर्षाने नव्हे, तर समन्वयाने मात करू लागले. कुणालाही विरोध नाही, हे महात्मा बसवेश्वरांचे वचन तर सोबत होतेच, त्याशिवाय ‘अभाविप’चे काम करताना त्यांना नानाराव ढोबळे, बाळासाहेब आपटे, अनिरुद्ध देशपांडे, म. पु. केंदुरकर, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे आणि मुख्यतः शामसुंदर जाजू, सदाशिव देवधर यांच्या विचारांचा परिसस्पर्श लाभला. तसेच, ‘पद्मश्री’ दादा इदाते आणि ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांच्यामुळे, समरस विचारांच्या पायावर त्यांनी प्रत्यक्ष कृतीचा कळस उभारला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, त्यांच्या पत्नीने आरती यांनी त्यांना समर्थ साथ दिली.
2020 मध्ये लिंगायत समाजातील काही लोकांनी, ‘आम्ही हिंदू नाहीत’ असे म्हणून मोर्चे काढले. शोषित, वंचित समाजघटकांना भ्रमित करून, त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहापासून तोडले जाण्याचा प्रयत्न काही लोक आणि संस्था करतात, हे त्यांनी आधी पाहिले होतेच. हेच लोण आता आपल्या समाजातही आलेले पाहून, प्रा. गजानन व्यथित झाले. त्यांना आठवले आपण कधीही हिंदू समाजापासून वेगळे नव्हतो. लहानपणी बाबा पहाटे हनुमान, महादेव, गणपती या सगळ्या देवांचे स्तोत्र म्हणून घेत. तसेच, सणासुदीला आई कोंड्याचा मांडा करून, गोडधोड बनवे. त्यावेळी आई तो पदार्थ पहिल्यांदा, परिसरातील हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, महादेवाचे मंदिर इथे भक्तिभावाने देत असे. पाडवा, दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, दसरा सगळे उत्सव, घरात आणि समाजातही उत्साहात साजरे होत असत. महात्मा बसवेश्वरांचे विचार कुणालाही तोडत नाहीत तर जोडतात. समाजापुढे त्यांचे हे विचारकार्य सत्य स्वरूपात आणायचे, हा निर्धार त्यांनी केला. ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंचा’चे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक म्हणून, ते काम करू लागले. याच माध्यमातून त्यांचा हेमंत हरहरे यांंच्याशी दृढ संपर्क झाला.
प्रा. गजानन म्हणतात की, “शेवटच्या श्वासापर्यंत जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या अमूल्य तत्त्वज्ञानाचा, वचनांचा सर्वांगीण अभ्यास करणार आहे. त्या विचारांचा समाजात जागर करणार आहे.” महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा जगणार्या प्रा. गजानन धरणे यांचे कार्य, समाजासाठी दिशादर्शकच आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!