नवी दिल्ली: ( 9 dignitaries from Maharashtra awarded Padma award ) देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणार्या ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात ‘पद्म’ पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या प्रजासत्ताक मंडपात सोमवारी झालेल्या नागरी प्रतिष्ठापना समारंभ-१ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २०२५ सालासाठी चार ‘पद्मविभूषण’, दहा ‘पद्मभूषण’ आणि ५७ ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केले.
प्रथम टप्प्यात पार पडलेल्या ‘पद्म’ पुरस्कार समारंभात महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’, तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार-उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जसपिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी, चैत्राम पवार यांना पर्यावरण-वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यांत केली जात आहे. या कार्यक्रमात ७१ जणांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये चार ‘पद्मविभूषण’, दह ‘पद्मभूषण’ आणि ५७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित ६८ ‘पद्म’ पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत १३९ जणांची निवड करण्यात आली आहे, त्यात सात ‘पद्मविभूषण’, १९ ‘पद्मभूषण’ आणि ११३ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे.