मुंबई: ( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित होण्यासाठी अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा, बस येण्याची वेळ कळावी, यासाठी ‘जीपीएस प्रणाली’ आणि उत्पन्नवाढीसाठी विविध सुधारणा राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, “उत्पन्न वाढीसाठी वांद्रे, दिंडोशी आणि देवनार येथील बसडेपोचा पुनर्विकास करताना व्यावसायिक गाळे, रहिवाशी प्रकल्प यांचा समावेश करावा.” मराठी सिनेमासाठी पाच ठिकाणी थिएटर उभारणीचा विचारही मांडण्यात आला. ‘बेस्ट’साठी पालिकेच्या अर्थसंकल्पात किमान तीन टक्के निधी राखून ठेवण्याची शिफारस करण्यात आली.
बैठकीत ‘बेस्ट’ व्यवस्थापनाने टोलमाफी, सरकारी करमाफी, कर्मचार्यांच्या थकबाकीबाबतही मागण्या मांडल्या, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन, मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अॅड. आशिष शेलार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या ‘बेस्ट’कडे 2 हजार, 783 बसेस असून त्यांपैकी 875 इलेक्ट्रिक आहेत. 2027 पर्यंत सर्व बसेेस इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून, त्यासाठी आणखी 2 हजार, 400 बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बसची वेळ सामजण्यासाठी ‘बेस्ट’ ‘गुगल’सोबत ‘जीपीएस’करिता करार करणार आहे. मेट्रो, लोकल, मोनोरेल आणि बस यांना एकत्र जोडणार्या मोबिलिटी प्लॅटफॉर्मचा लाभ ‘बेस्ट’ला मिळणार आहे.