मुंबई (विशेष प्रतिनिधी): (IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पत्रकार शिरीन भान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, " आम्ही हरित ऊर्जा, हरित तंत्रज्ञान, उत्पादन, पायाभूत सुविधा अशा अनेक प्रकल्पावर कार्यरत आहोत. भारताला एक नवे वाढवण बंदर मिळणार असून मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. वाढवण बंदर हे समृद्धी महामार्गाद्वारे नाशिकसह राज्यातील विविध २७ जिल्ह्यांशी जोडले जाणार आहे. शिवाय नवी मुंबई विमानतळ, पुणे विमानतळ लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होईल, वाढवण बंदराजवळ आम्ही मुंबईसाठी तिसरे विमानतळ उभारत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी त्वरित मान्यही केली होती. धर्मवीर छत्रपती संभाजी सागरी महामार्ग (कोस्टल रोड) आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अटल सेतूसह विविध महामार्गांनी सुसज्ज असे एमएमआर रिजन तयार असणार आहे. अर्थात आयमॅकसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
"वाढवण सारख्या बंदराजवळ एक विमानतळ उभे राहणार असून 'पोर्ट आणि एअरपोर्ट' शेजारी असल्याने यामुळे एक वेगळी इकोसिस्टम उभी राहणार आहे. अटल सेतू, जेएनपीटी बंदराजवळ आम्ही तिसरी मुंबई तयार करणार असून ज्यात शैक्षणिक शहर, तंत्रसुसज्ज शहर म्हणून तिसरी मुंबई उभी राहणार आहे. या भागात उभी राहणारी रहिवासी संकुले ही सर्वसामान्यांना परवडणारी असतील. चौथी मुंबई ही वाढवण बंदरानजीक उभी राहणार असून बुलेट ट्रेनद्वारे २०-२५ मिनिटांत आणि रस्ते महामार्गाने किमान ४० ते ४५ मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होईल. येत्या २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन मुंबईत धावेल. गेल्या काळात महाराष्ट्रात जे सरकार आले त्यांनी हा प्रकल्प पूर्णपणे मातीत मिळवण्याचा प्रयत्न केला. बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले मात्र आपले सरकार आल्यानंतर आपण पुन्हा हा प्रकल्प कार्यान्वित होईल याचा प्रयत्न केला, अर्थात गुजरातला स्थिर सरकार लाभल्याने तिथली कामे वेगाने पुढे सरकत गेली. आपणही यात प्रगती करत आहोत", असेही ते पुढे म्हणाले.
"मात्र, महाराष्ट्र यात आता कुठेही मागे राहणार नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भाग उद्योगधंद्यांतील गुंतवणूकीद्वारे प्रवाहात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुरप्रवण क्षेत्रातील नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवून दुष्काळी प्रदेश ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ज्यामुळे शेती आणि उद्योगधंद्याला पूरक असे वातावरण तयार होईल", असेही फडणवीस म्हणाले. आयमॅकसाठी महाराष्ट्राची सुसज्जता या विषयावर ते बोलत होते. 'आयमॅक'चा वापर आम्ही ईव्ही क्षेत्रासाठी करून घेणार आहोत. ई-वाहनांची मागणी ज्या प्रकारे वाढत आहे, त्यानुसार देशविदेशातील गुंतवणूक महाराष्ट्रात खेचण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. ज्या अर्थी आयमॅक हा भविष्यात महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून उभा असेल त्याचा फायदा निश्चितच इथल्या विविध क्षेत्रांसाठी होईलच. केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर आयमॅकमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक देशांसाठी हा गेमचेंजर ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.