छंदातून व्यावसायिकतेकडे प्रवास करणार्या कर्जतच्या सृजनशील कलाकार मानसी सुळे हिच्याविषयी....
'कोरोना’चा काळ आपल्या सर्वांसाठीच कधीही न विसरता येण्यासारखाच. कित्येकांनी आपले आप्तस्वकीय या काळात गमावले, तर कित्येकांनी खचून न जाता विकासाच्या नव्या वाटा शोधल्या. आपल्यातील कलाकाराला जागवत, यशाची नवी शिखरे गाठली. अशाच एका सृजनशील तरुणीला, याच काळात आपल्यातील कला जोपासायची संधी मिळाली, या संधीचे सोने करत आज तिने व्यवसायाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. कर्जतची चित्रकार मानसी सुळे हिला नुकताच ‘आर्ट्स बिट्स फाऊंडेशन’ पुणे यांचा, ‘महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार 2024’ मिळाल्याबद्दल, तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मात्र मानसीचा हा कलाप्रवास, अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी आहे.
रायगड तालुक्यातील कर्जत येथील विठ्ठलनगर येथे राहणार्या मानसी सुळे हिने वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सद्यस्थितीत मानसी ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. शालेय जीवनापासून तिला चित्र काढायची आवड होती. प्रसिद्ध चित्रकार सुनील परदेशी यांच्याशी ओळख झाल्यानंतर, तिने त्यांच्याकडून आपली आवड जोपासण्याइतके मार्गदर्शन घेतले. ’वसंतऋतु’ आणि ’निसर्ग’ हा विषय घेऊन तिने अनेक चित्रे साकारली. मात्र, ‘कोरोना’काळात मानसीला आपल्यातील कलाकाराला उभारी देण्यासाठी खर्या अर्थाने वेळ मिळाला. तेव्हापासून सुरू झालेला हा कलाप्रवास आज आठ वर्षे इतका अनुभवसंपन्न झाला आहे.
सन 2018 पासून मानसीने, कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसराई, मुंज, डोहाळे जेवण, हळदी-कुंकू वाण, वाढदिवस भेटवस्तू, गणपती आरास ते दिवाळीत आकाश कंदील अशा विविध वस्तू बनवण्याचे काम आजपर्यंत अविरहितपणे सुरू आहे. पर्यावरणप्रेमी असणार्या मानसीने, पर्यावरणास हानिकारक ठरणार्या वस्तूंचा पुनर्वापर करून, त्यातून कलाकुसरीच्या, शोभेच्या आणि उपयोगात येणार्या वस्तूंवर आतापर्यंत कल आणि भर दिला. यातूनच टाकाऊ प्लास्टिक-काचेच्या बाटल्या, टाकाऊ प्लास्टिक, ज्यूट, टाकाऊ पेपर, लाकडापासून पेन स्टँड, घड्याळ, ड्रीम कॅचर, वॉल हँगिंग, नेम प्लेट, चहाचे कोस्टर, ग्रीटिंग कार्ड, टेबल लॅम्प, प्लांटर या वस्तू आतापर्यंत तयार केल्या. आजपर्यंत विक्री झालेल्या वस्तूंची संख्या, 500 हून अधिक आहे.
मानसी सांगते, “सुरुवातीच्या काळात मी नागरिकांना आवाहन केले की, तुमच्याकडच्या टाकाऊ वस्तू मला आणून द्या. बघता बघता मी त्या जमा झालेल्या कचर्यातून, इतक्या सुंदर वस्तू घडविल्या की लोक मला घरातील वस्तू टाकून न देता, घरी आणून देऊ लागले.” इतका अप्रतिम प्रतिसाद मानसीला मिळू लागला. सोशल मीडियाचा मानसीच्या या यशात मोलाचा वाटा असल्याचे ती सांगते. “माझा कधीही या वस्तू विकण्याचा हेतू नव्हता. मी आवड म्हणून बनवत गेले आणि त्या वस्तू सोशल मीडियावर टाकत गेले. त्यावर अनेकांनी या वस्तू विकत घेण्याबाबत विचारणा केली. माझा कल कायमच कमी किमतीत वस्तू विकण्याकडे असतो,” हे मानसी आवर्जून सांगते.
याच आवडीतून मानसीने ’पेस्टल सोसायटी ऑफ आर्ट, अमेरिका’ या मानाच्या संस्थेचा पुरस्कार घेणारे व या संस्थेचे स्वाक्षरी मेंबर राहिलेले अनुभवी सुप्रसिद्ध चित्रकार सुनिल परदेशी यांच्याकडे, चित्रकलेचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. पहिल्यापासून क्रिएटिव्ह जगात काहीतरी करण्याचे स्वप्न बघणार्या मानसीने चित्र आणि वस्तू या दोन्हींमध्ये, आपले काम करण्यास सुरुवात केली. हे करत असताना, पारंपरिक तसेच लोककला व आधुनिक कलेतील विविध अंगांचा वापर करून योगदान देण्याचा प्रयत्न केला. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’बाहेरील आर्ट प्लाझा येथे मानसी सुळे हिचे यशस्वी चित्र प्रदर्शन झाले आहे. एक दिवस याच ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मधील आतील कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन असेल, हे स्वप्न मानसी हिचे आहे.
मानसीने आजपर्यंत सर्व काम हे एकटीनेच पूर्ण केले. कारण तिच्या कामाला व व्यावसायिक स्वरूप देण्याचा कधीच हेतू नव्हता. मात्र, मानसीला प्रतिसाद मिळत गेला आणि हळूहळू मानसीच्या कलेला व्यावसायिक स्वरूप मिळत गेले. सध्यातरी मानसी एकट्यानेच सगळी जबाबदारी पार पाडत आहे. तिच्या कुटुंबाचा या सगळ्यात खूप मोलाचा वाटा आहे. कारण आज मानसी पुन्हा कलाक्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण घेते आहे. हे सर्व करत असताना, पूर्ण वेळ तिला केवळ या कलेच्या निर्मितीसाठी द्यावा लागतो. मात्र, कुटुंब कोणतीही तक्रार न करता, तिच्यासोबत आज भक्कमपणे उभे आहे. मानसीच्या कुटुंबात आई, बहीण आणि ती स्वतः आहे. मानसीची बहीण स्वतः एक प्रशिक्षित कलाकार आहे. त्यामुळे बहिणीच्या सहकार्यानेच, तिने आजपर्यंतचा प्रवास केला. सध्या मानसी स्वतः ‘ठाणे स्कुल ऑफ आर्ट’मधून ‘आर्ट टीचर डिप्लोमा’च्या द्वितीय वर्षाला आहे.
मानसीचे स्वप्न आहे की, ग्रामीण भागातील महिलांना या क्षेत्रात प्रशिक्षण देत रोजगारक्षम करावे. मानसी म्हणते की, प्रत्येकाने आपल्यातील कलाकार जोपासावा. पालकांनीही आपल्या मुलांना जर एखाद्या कलेत आवड असेल, त्या क्षेत्रात त्याला करिअर करण्याची संधी द्यावी. आज कलाक्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी आहेत. त्याला गरज आहे, ती तुमच्या सर्वांच्या सहकार्याची. मानसी सुळे हिचे आजपर्यंचे यश आणि प्रवास, नक्कीच उल्लेखनीय आहे. मानसीला तिच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अनेकानेक शुभेच्छा!