'द हिंदू मॅनिफेस्टो' हिंदूंसाठी एक आवश्यक संदर्भग्रंथ : सरसंघचालक
28-Apr-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (The Hindu Manifesto) " 'द हिंदू मॅनिफेस्टो' हे पुस्तक हिंदूंसाठी आवश्यक संदर्भग्रंथ असून विद्वान, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयात नुकतेच वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्या द हिंदू मॅनिफेस्टो या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, ऐतिहासिक कालखंडात भारताचा प्रभाव आक्रमकतेशिवाय पसरला, परंतु नंतर आत्मसंतुष्टता आणि संकुचित वृत्तीमुळे धर्माच्या मूल्यांकडे दुर्लक्ष झाले. भौतिकवादी विकासाचे पाश्चात्य मॉडेल अयशस्वी झाले आहेत आणि त्यामुळे असंतोष आणि पर्यावरणीय संकट जन्माला आले. जगाला मार्गदर्शन करण्यापूर्वी हिंदूंना स्वतःच्या जीवनात 'द हिंदू मॅनिफेस्टो'मध्ये नमूद केलेली तत्त्वे अंमलात आणावी लागतील.
द हिंदू मॅनिफेस्टो पुस्तकाविषयी उल्लेक करत ते म्हणाले, हे पुस्तक धर्माचे खरे स्वरूप पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न करते, जे वैश्विक वास्तव आणि आध्यात्मिक चेतनेवर आधारित आहे. हे हिंदू धर्माची बौद्धिक संपदा आणि त्याची जागतिक दृष्टी लोकांमध्ये पसरवण्याचे काम करेल. धर्म हा निव्वळ कर्मकांड नसून जीवनाच्या वैश्विक सत्याचे आणि आध्यात्मिक चेतनेचे जिवंत प्रकटीकरण आहे.
पुस्तकाचे लेखक स्वामी विज्ञानानंद म्हणाले की, हे पुस्तक प्राचीन भारतीय ज्ञानाला समकालीन काळानुसार पुन्हा परिभाषित करते. हिंदू विचार परंपरेने नेहमीच वेळोवेळी उपाय मांडले आहेत, तर त्याची मुळे शाश्वत तत्त्वांमध्ये स्थापित आहेत. जे ऋषीमुनींनी सूत्रांद्वारे व्यक्त केले आहे. ‘द हिंदू मॅनिफेस्टो’ हा अनेक पवित्र ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथांच्या सखोल अभ्यासाचा परिणाम आहे, जो जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रभावी मार्गदर्शक ठरेल. 'द हिंदू मॅनिफेस्टो'ची आठ मुख्य तत्त्वे आहेत - सर्वांसाठी समृद्धी, राष्ट्रीय सुरक्षा, दर्जेदार शिक्षण, जबाबदार लोकशाही, महिलांचा आदर, सामाजिक सलोखा, निसर्गाचे पावित्र्य, मातृभूमी आणि वारसा यांचा आदर.
पुढे ते म्हणाले, हिंदू परंपरा पाश्चात्य भांडवलशाही किंवा समाजवादापेक्षा संतुलित आर्थिक मॉडेलचे समर्थन करते, ज्यामध्ये संपत्ती निर्मिती आणि न्याय्य वितरण दोन्ही महत्त्वाचे आहेत. खरा धर्म केवळ क्षमाच नाही तर गरज पडल्यास शत्रूला मारण्याचीही शिकवण देतो, ज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भूतकाळात मोठी हानी झाली आहे. औपनिवेशिक काळात भारतीय शिक्षण पद्धतीच्या नाशावर त्यांनी चर्चा केली आणि दर्जेदार शिक्षणाच्या गरजेवर भर दिला. स्वामीजींनी हिंदू सभ्यतेचा जबाबदार शासन आणि लोकसहभागावर आधारित दृष्टिकोन अधोरेखित केला.
अहिंसा हा आपला धर्म आहे
पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहताना सरसंघचालक म्हणाले की, अहिंसा हा आपला स्वभाव आहे, आपले मूल्य आहे, परंतु काही लोक बदलणार नाहीत, ते जगाला त्रास देतच राहतील, त्यामुळे याबाबत काय करावे? अहिंसा हा आपला धर्म आहे आणि गुंडांना धडा शिकवणे हाही आपला धर्म आहे. आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, पण तरीही कोणी वाईट कृत्य केले तर दुसरा पर्याय कोणता? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, राजाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे.