धर्म : विद्ध्वंसाचा नव्हे, तर पुनर्निर्माणाचा दीपस्तंभ!

    28-Apr-2025
Total Views |

धर्म : विद्ध्वंसाचा नव्हे, तर पुनर्निर्माणाचा दीपस्तंभ!


पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘दहशतवादाला धर्माला नसतो’ या विधानातील फोलपणा पुनश्च अधोरेखित झाला. तसेच या हल्ल्यानंतर कोणताही धर्म हिंसाचाराचे धडे देत नाही वगैरेही वक्तव्येही नेहमीप्रमाणे कानावर आली. त्यानिमित्ताने मानसशास्त्रीयदृष्ट्या धर्म आणि दहशतवाद यांच्यातील अन्योन्य संबंधांचे विविध कंगोरे उलगडणारा हा लेख...


मानवाच्या इतिहासात धर्म हा आशेचा दीपस्तंभ राहिला आहे, ज्याने संकटात आधार दिला, दुःखात हृदयावर फुंकर घातली आणि माणसाच्या अस्तित्वाला दैवी अर्थाची जोड दिली. पण, जेव्हा धर्माच्या पवित्र कलशात राजकीय महत्त्वाकांक्षा, असह्य असंतोष आणि तुटलेल्या स्वप्नांची राख मिसळली जाते, तेव्हा त्या कलशात राखच उरते आणि त्यातून दहशतीचे विषारी वावटळ उठते. धर्म, जो मुळात माणुसकीच्या उन्नतीसाठी जन्मलेला, तोच जेव्हा तिरस्काराचा, हिंसेचा आणि विभाजनाचा ध्वज बनतो, तेव्हा माणूस स्वतःच्या मूळ अस्तित्वालाच हरवतो.

आपली यात्रा अनेकदा श्रद्धेपासून सुरू होते. आपल्याकडे सर्व उत्तरे नसतात किंवा संपूर्ण चित्र स्पष्ट दिसत नसते, तरीही आपण मनात विश्वास ठेवून पहिले पाऊल उचलतो. जेव्हा आपण श्रद्धेने एखादी कृती करतो, तेव्हा आपण स्वतःला एका उच्च शक्तीच्या प्रेरणे खाली सोडतो, जी आपल्याला अशा अद्भुत वाटांवर घेऊन जाऊ शकते, ज्या आपण कधी स्वप्नातही पाहिल्या नसतील. ही श्रद्धा आपल्याला आपल्या ध्येयांच्या मागे धाडसाने धावायला शिकवते आणि प्रत्येक टाकलेले पाऊल आपल्याला आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ नेते, यावर विश्वास ठेवायला शिकवते.

आज धर्माच्या पवित्र नावाखाली घडणारा दहशतवाद हा केवळ राजकीय किंवा सामाजिक प्रश्न नाही; तो मानवी मनाच्या खोल गर्तेत वाहणार्या असाहाय्यतेचा, अस्मितेच्या जखमांचा आणि अस्तित्वाच्या वेदनेचा भेदक आक्रोश आहे. धर्मप्रेरित दहशतवाद कसा जन्म घेतो, त्यामागे कोणते भावनिक प्रवाह कार्यरत असतात आणि शेवटी, माणुसकीच्या दीपस्तंभाला पुन्हा तेजस्वी करणारा कोणता मार्ग आपण स्वीकारू शकतो. कारण, धर्म जर माणसाला जोडणारा दुवा असेल, तर त्याच्या नावावर माणसामाणसांत शत्रुत्वाचे विष पसरवणार्या अंधाराचा आपण एकत्रित सामना केला पाहिजे.

धर्माच्या अधिष्ठानावर घडणारा दहशतवाद हा आजच्या जगाच्या संवेदना हलवणारा आणि माणुसकीच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणारा विदारक प्रवाह आहे. याच्या मानसशास्त्राची उकल करायची असेल, तर केवळ राजकीय किंवा सामाजिक विश्लेषण पुरेसे ठरत नाही, तर मानवी मनाच्या खोल गाभ्यात उतरून त्या तुटलेल्या स्वप्नांच्या, जखम झालेल्या अभिमानाच्या आणि अर्थशून्यतेच्या काळोख्या गुहेत शिरणे आवश्यक आहे.

धर्म, जो मुळात मानवाला आश्रय देतो, अस्तित्वास अर्थ देतो आणि सहअस्तित्वाची उब देतो, जेव्हा विकृत व्याख्यांनी आणि संकुचित हेतूंनी वाकवला जातो, तेव्हा तोच धर्म द्वेष आणि हिंसेचे भीषण शस्त्र बनतो. धर्मप्रेरित दहशतवादाकडे वळणार्या व्यक्ती अप्रगल्भ असतात, संवेदनशील आणि धडपडणार्या असतात. खळखळणारी दिशाहीन ऊर्जा त्यांच्याकडे असते. समाजाच्या बेगडी वागणुकीने जखमी झालेले त्यांचे मन, अपमानाचे चटके झेललेली त्यांची अस्मिता, चुकीच्या धार्मिक संदेशाने अडकलेले त्यांचे मन आणि आयुष्याला अर्थ देण्याची असह्य तगमग, या सर्वांच्या ओघात ते हळूहळू कट्टरतेच्या जाळ्यात अडकत जातात. जेव्हा एखादा अतिरेकी गट त्यांच्या समोर धर्माच्या नावाखाली शौर्य, बलिदान आणि मोक्षाचे चित्र रंगवतो, तेव्हा त्यांना सामान्यांना वाटते की, अखेर त्यांच्या वेदनांना एक दैवी अर्थ लाभला आहे. त्यांच्या असाहाय्यतेला नायकत्वाचा झगमगाट प्राप्त होतो. ‘आपण विरुद्ध ते’ अशी कृत्रिम भिंत उभी केली जाते. धर्माची रक्तरंजित निवडक आणि विकृत मांडणी त्यांच्या मनात रोवली जाते आणि दुसर्यांच्या अस्तित्वालाही शत्रू ठरवण्याचा विषारी भाव निर्माण होतो. कधीकाळी करुणा आणि प्रेमाचे धडे देणारा धर्म, आता रक्तरंजित विखारी घोषणांचा आवाज बनतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, या प्रक्रियेत स्वसंवेदना लोप पावते, नैतिक जबाबदारीचे बंध तुटतात आणि हिंसा एक ‘पवित्र कर्तव्य’ म्हणून प्रतिष्ठित केली जाते. एका असाहाय्य माणसाला जर त्याच्या वेदनेला मोक्षाचा मार्ग म्हणून हिंसाचारच दाखवला गेला, तर तो त्या मार्गाने जाणे, हा केवळ अपरिहार्य परिणाम ठरतो.


पण, इथेच सत्याचा किरण डोकावतो. धर्म हा कधीही हिंसेचा पुरस्कार करत नाही. सर्व धर्मांच्या उन्मळत्या शिरपेचात माणुसकीची करुणा, प्रेम आणि समन्वय यांचीच गंधपुष्पे विणलेली आहेत. धर्माचे जेव्हा राजकीय व व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांनी विकृत भाष्य केले जाते, तेव्हाच त्याचा अशा भयानक हिंसेत वापर होतो. त्यामुळे धार्मिक दहशतवादाला रोखण्याची लढाई केवळ तलवारीची किंवा तोफेची नाही, ती आहे, संवेदनशीलतेची, समजुतीची आणि मानसशास्त्रीय पुनर्बांधणीची.


जिथे असंतोष आहे, तिथे न्याय द्यायला हवा, जिथे तुटलेपण आहे, तिथे आपुलकीने हात धरायला हवा. धर्माचा अर्थ नव्याने सांगायला हवा. असा धर्म जो विभाजन घडवत नाही, तर माणुसकीच्या सेतूची उभारणी करतो. जेव्हा अपमानाने विद्ध झालेल्या हृदयांना सन्मान मिळेल, जेव्हा हरवलेल्या अस्तित्वांना अर्थ गवसेल, तेव्हा दहशतवादाची विषारी वेल आपोआप सुकून जाईल.


धार्मिक दहशतवादाच्या मानसशास्त्रातून आपल्याला एक करुण साक्षात्कार मिळतो. मानवतेचा अर्थ, धर्माची ओळख आणि मोक्षाचा शोध जर चुकीच्या मार्गाने वळला, तर त्याचा शेवट हिंसेच्या खोल गर्तेत होतो. या अंधाराचा प्रतिकार करण्यासाठी, आपल्याला धर्माच्या खरीखुरी शिकवणीकडे, करुणा, क्षमा आणि माणुसकीच्या सनातन तेजाकडे पुन्हा वळले पाहिजे. कारण शेवटी, धर्म हा विद्ध्वंसाचा नव्हे, तर पुनर्निर्माणाचा दीपस्तंभ असतो.


मनोवाटा
डॉ. शुभांगी पारकर