नवी दिल्ली : (Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. या मुदतीचा काल शेवटचा दिवस होता. २३ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. यामध्ये नऊ सनदी अधिका-यांचा समावेश आहे. याच चार दिवसांच्या काळात ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. हे सर्वजण अटारी सीमेवरून मायदेशी परतले आहेत.
केंद्र सरकारने १२ श्रेणींमधील शॉर्ट टर्म व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परत जाण्यास सांगितले होते. त्यानुसार ९ अधिकाऱ्यांसह ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. दरम्यान, एका अधिकाऱ्यासह ११६ भारतीय नागरिक रविवार दि. २७ एप्रिल रोजी अटारी-वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानहून भारतात परतले आहेत. २६ एप्रिल रोजी १६ अधिकाऱ्यांसह ३४२ भारतीय नागरिक परतले आहे. २५ एप्रिल रोजी २८७ व २४ एप्रिल रोजी १०५ भारतीय नागरिक स्वगृही परतले आहेत. या सर्वांनी अटारी-वाघा सीमेचा वापर केला.
सार्क व्हिसाधारकांना २७ एप्रिलच्या आधी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच वैद्यकीय व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत मायदेशी परत जाण्यास सांगितले आहे. व्हिसा ऑन अरायव्हल, बिझनेस, चित्रपट, पत्रकारिता, ट्रान्झिट, कॉन्फरन्स, गिर्यारोहण, विद्यार्थी, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठीचा व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगितले होते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\