प्रत्येक विभागात अवयव प्रत्यारोपण केंद्रसुरू होणार : आरोग्यमंत्री आबिटकर
आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश । नाशिक, अमरावती, कोल्हापूर, सोलापुरात प्रत्यारोपण केंद्रांची उभारणी
28-Apr-2025
Total Views | 8
नाशिक (Organ Transplant Center): आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
तसेच “अवयव प्रत्यारोपणासाठी नाशिककरांना मुंबईला यावे लागते. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करावे,” अशी मागणी आ. प्रा. फरांदे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे, ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. भरत शहा आदी उपस्थित होते.
अवयवदान प्रक्रिया सुलभ करणार
शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्राच्या निर्मितीबरोबरच तेथे समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेसाठी तातडीने निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर विभागीय प्राधिकरण समित्यांच्या जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ करण्यात येईल. तसेच राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती, पारदर्शकता आणि परिणामकारकता मिळवून अधिकाधिक रुग्णांना जीवनदान देता येईल.
- प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य येथे सुरू होणार प्रत्यारोपण केंद्र
येथे सुरु होणार
प्रत्यारोपण केंद्र
“शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठित रुग्ण येत असूनही त्याची नोंदणी केली जात नाही,” अशी खंत आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली. यावेळी बैठकीत “नाशिकसह अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे नवीन प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येईल,” असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.