नवी दिल्ली : (India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बंदी घालण्यात आलेल्या युट्यूब चॅनेल्समध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज यासारख्या प्रमुख पाकिस्तानी माध्यम समूहांसह माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांसारख्या पत्रकारांनी चालवलेले युट्यूब चॅनेल देखील भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले आहेत. इतर बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.यापैकी बऱ्याच वृत्तवाहिन्या आहेत आणि अनेक पत्रकारांचे स्वतःचे चॅनेल आहेत.या चॅनेल्सवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षादलांविरोधात खोटी, दिशाभूल करणारी माहिती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती पसरवल्याचा आरोप आहे.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, Government of India has banned following Pakistani YouTube channels for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and misinformation against India, its Army and security… pic.twitter.com/2AjzeEuCsW
बंदी घातलेले चॅनेल्स पाहताना भारतीय वापरकर्त्यांना आता युट्यूब कडून एक संदेश पाठवला जातो ज्यामध्ये म्हटले आहे की, "राष्ट्रीय सुरक्षा किवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही." याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी संरक्षण कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नये, असा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यम वाहिन्यांना दिला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\