मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ABVP in JNU Election Result) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले.
हे वाचलंत का? : दहशतवाद्यांना ‘दहशतवादी’ म्हणण्यास ‘बीबीसी’ला अडचण
जेएनयूच्या राजकीय परिस्थितीतील हा केवळ ऐतिहासिक बदल नाही तर राष्ट्रवादी विचारधारेवर आधारित विद्यार्थी चळवळीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, अशी भावना सध्या व्यक्त होत आहे. सहसचिव पदावर अभाविपने बाजी मारली असली, तरी अभाविपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस या पदांसाठी चुरशीची लढत दिली. जेएनयूच्या विद्यार्थी वर्गात राष्ट्रवादी विचारांची स्वीकृती वाढत असल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.
वैभव मीणा म्हणाले की, जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या सहसचिवपदी निवड होणे ही केवळ माझ्यासाठी वैयक्तिक उपलब्धी नसून आदिवासी चेतना आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा विजय आहे, ज्याला वर्षानुवर्षे दडपण्याचा प्रयत्न केला गेला. हा विजय त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आशेचे प्रतीक आहे ज्यांना आपली सांस्कृतिक ओळख आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेने शैक्षणिक क्षेत्रात पुढे जायचे आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सुसंवादी लोकशाही मूल्ये, संवाद आणि सर्वसमावेशकता मजबूत करण्यासाठी मी अत्यंत समर्पण आणि पारदर्शकतेने काम करण्याचे वचन देतो. हा विजय जेएनयूच्या उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल आहे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, सन्मान आणि देशाप्रती वचनबद्धतेसह प्रगती करण्यासाठी वातावरण मिळते.
२५ वर्षांनंतर दोन जागा जिंकल्या
जेएनयूचा डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये अभाविपने २५ वर्षांनंतर दोन जागा जिंकल्या. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्येही, जे बर्याच काळापासून डाव्या प्रभावाखाली होते, अभाविपने दोन जागा जिंकून एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण केली. स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या एकमेव जागेसाठी सुरेंद्र बिश्नोई, स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीजच्या तीन जागांसाठी प्रवीण पीयूष, राजा बाबू आणि प्राची जैस्वाल आणि स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिनच्या जागेसाठी गोवर्धन सिंग यांची बिनविरोध निवड झाली.
वैभव मीणा यांचा अल्पपरिचय
वैभव मीणा हा मूळचा करौली, राजस्थानचा रहिवासी आहे. तो जनजाती शेतकरी कुटुंबातून आला आहे. त्यांनी राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथून पदवी आणि बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या, वैभव हे भारतीय भाषा केंद्र, भाषा, साहित्य आणि संस्कृती संस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे हिंदी साहित्याचे संशोधन अभ्यासक आहेत. त्यांना हिंदी साहित्यात ज्युनियर रिसर्च फेलोशिप (J.R.F.) देखील मिळाली आहे. शैक्षणिक कामगिरीव्यतिरिक्त, वैभव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) दोन वर्षांचा कार्यक्रमही यशस्वीपणे पूर्ण केला आहे. सध्या ते जेएनयूच्या कावेरी वसतिगृहाचे अध्यक्ष आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्रसिंह सोलंकी म्हणाले, "जेएनयूमध्ये राष्ट्रवादाची नवी पहाट सुरू झाली आहे. आज जेएनयूच्या पवित्र भूमीवर इतिहास रचला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या लोकशाही निर्णयाने विद्यापीठाच्या परिसरात वर्षानुवर्षे खिळखिळ्या झालेल्या डाव्या विचारसरणीच्या भिंती आज तुटल्या आहेत. केंद्रीय पॅनेलवरही आपली उपस्थिती नोंदवली आहे, हा विजय प्रत्येक विद्यार्थ्याचा विजय आहे, जो शिक्षणाला राष्ट्र उभारणीचा आधार मानतो. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हितासाठी आम्ही संघर्ष करत राहू आणि 'राष्ट्रप्रथम' हा आदर्श प्रस्थापित करू.
एकतर्फी विचारसरणीच्या विरोधात लोकशाही क्रांती
अभाविप जेएनयू युनिटचे अध्यक्ष राजेश्वर कांत दुबे म्हणाले, जेएनयू मधील हा विजय केवळ अभाविपच्या अथक परिश्रमाचा आणि राष्ट्रवादी विचारावरील विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा पुरावा नाही, तर हा त्या सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे जे शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा आधार मानतात. ही एकतर्फी विचारसरणीच्या विरोधात लोकशाही क्रांती आहे. जेएनयू मध्ये प्रस्थापित केलेल्या पराकोटीच्या संकल्पनेतून भविष्यात पराकोटीचे कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.