पहलगाम हल्ल्याने देश पेटून उठला. सर्वांच्याच मनात पाकिस्तान विरोधात असंतोष खदखदतो आहे. अथार्र्त, लहानमुलेही त्याला अपवाद नाहीत. वीररस हा लहान मुलांचा आवडता रस. वाईटावर चांगल्याचा विजय होणार असेल, तर भुमिका कोण करणार हे शोधावेच लागत नाही, इतके हात वर येतात. मुलांना पराक्रम आवडतो , तसेच ते इतर रसाचाही आस्वाद घेतात, एखाद्या सैनिकाप्रमाणेच. त्यामुळे, रंगभुमी आणि युद्धभुमी यांच्यात फार फरक वाटतच नाही. बालकलाकारांमधील वीररसाचा घेतेलेला हा आढावा....
युद्धात निःशस्त्र राहून चालत नाही. तसेच, रंगभूमीवर रंगांची उधळण असल्याशिवाय ती रंगभूमी कशी! पहलगामच्या भूमीवर पर्यटक म्हणून गेलेल्या कोवळ्या मुलांची, पत्रकारांनी घेतलेली मुलाखत घेतली पाहिली. एकदा नव्हे तर चारदा पाहिली. ते एवढ्याकरिता की, दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या मुलाच्या चेहर्यावरचे भाव वेगळेच होते. त्याच्या चेहर्यावरचा रंग उडालेला होता आणि त्याच्या बोलण्यात, अचानक मोठे झाल्याचे भाव दिसत होते. रसभाव, रंगरूपक हालचाली आणि आवाजातले स्वर, खोलवर रूतलेल्या घावांचे दर्शन घडवत होते. अनेक वर्षांपासून बालनाट्य प्रशिक्षक म्हणून काम करत असल्याने, नकळत मुलांचा अभ्यास करायला लागले आणि अनेक वेळा बघताक्षणी त्यांना काय होते आहे किंवा त्यांना काय सांगायचे आहे, हे आपसूक कळायला लागले. नाट्यभूमी, ज्याला आपण रंगभूमीसुद्धा म्हणतो, त्यात भावरूपी रंगांची उधळण होत असते. जेव्हा स्पर्धा जिंकायची असते, तेव्हा त्याची रणभूमी होते आणि जेव्हा आपल्यातल्या शत्रूला मारायचे असते, तेव्हा त्याची युद्धभूमीसुद्धा होते. ते शत्रू कोणते, ते सांगणारच आहे. पण, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे, खिन्न झाला आहे. जनसामान्यांमध्ये राग, असंतोष आणि द्वेष निर्माण झाला आहे. मग मुले कशी मागे राहतील? काल नाट्यशिबिरात तीच चर्चा सुरु होती.
रससिद्धांताप्रमाणे, प्रत्येक रसाला रंगाशी जोडले गेले आहे. जसे की रौद्ररस दर्शवणारा लाल, वीररस दर्शवणारा भगवा किंवा पिवळा. याचा उपयोग प्रकाशयोजना करताना वापरला जातो, म्हणून त्यास ‘रंगभूमी’ असेही म्हणतात. रंगभूमी आणि युद्धभूमी यांचा संबंध काय, ते पुढे जाऊन सांगेनच; पण त्या अगोदर आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, बालरंगभूमीवर मुलांना वीररसातली नाटके करायला आणि बघायलाही आवडतात. त्यांच्याकरिता या गोष्टी सोप्या असतात. दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा विजय, या संहितेला घेऊनच नाटक करायचे असते, काहींचा तर हट्टच असतो. थोडी मोठी मुले म्हणजे, नऊ ते 14 वयोगटातल्या मुलांना तर क्रांतिवीर, पोलीस, गुप्तहेर, राजा अशी कामे करायला प्रचंड आवडतात. नाटकातील खोटी खोटी मारामारी खरीखुरी समजून, ’असंख्य शत्रू सैनिकाने मारले’ अशा पद्धतीची वाक्ये घ्यायला त्यांना खूपच आवडते.
जर तुम्हाला आठवत असेल, तर तुमच्या बालपणी तुम्हीही असंख्य अदृश्य शत्रूंना, तुमच्या हातातल्या खोट्या खोट्या बंदुकीने खरे खरे मारले असेल. तुम्ही एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला आहात आणि त्या बेटावर, अचानक एक मगर तुमचा पाठलाग करते, त्यावेळी तुम्ही स्वतःला आणि तुमच्या भावंडांना तिच्यापासून कसे वाचवता, असे नाट्यखेळ खेळला असालच. संकटातून बाहेर येण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य वाटायच्या आणि कोणत्याही प्रसंगी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे नैसर्गिकच होते. हे तेव्हा तुम्हाला लक्षात आले का नाही, मला माहीत नाही पण, मागे वळून पाहिले की तुमच्या लक्षात येईल, बालपणी आपण किती बिनधास्त होतो. पण मग आता का नाही? बालपणीच आपली कल्पनाशक्ती का खुंटली असेल? का त्याला खतपाणी घालून रुजवले नसेल? त्याचे उत्तर असे आहे की, किती मुलांनी सलग तीन वर्षे तरी बालनाट्य केले आहे? कारण बालरंगभूमी अशी भूमी आहे, जिथे अशक्य काहीच नाही. इथे कल्पनाविष्कार घडत असतो आणि स्वप्नांचे मनोरे खुलत असतात. मग ते किती मुलांचे सत्यात उतरतात, हा वेगळा मुद्दा झाला. पण, निदान दृष्टीतरी मिळते, त्यातूनच शक्यताही निर्माण होतात.
युद्धभूमीवर योद्ध्यांना शत्रूशी लढायचे असते, त्यांना मारायचे असते. त्यासाठी बळ, जिगर, आत्मविश्वास, सराव, प्रशिक्षण, धैर्य, समयसूचकता, धारिष्ट्य, देशप्रेम, सहनशीलता, कणखरता, लवचिकता आणि निर्णयात्मकता, सृजनशीलता, चरित्र, सांघिक कार्यक्षमता हे लागतेच. योद्ध्याला फक्त एवढेच लागते का? तर नाही. त्याला वेळीस प्रेमाने, शांतपणे सांगावे लागते. ‘अरे डरो मत। हम भारतीय सैनिक हैं। हम आपकी मदत करने आए हैं।’ असे बोलत असलेला व्हिडिओ, तुम्ही पाहिला असेलच. हसत-हसत गाणी गात बसमध्ये प्रवास करतानाचा सैनिकांचा व्हिडिओसुद्धा, तुम्ही पाहिला असेल. सारखे कणखर राहून कसे चालेल? त्यांनाही संवेदना असतात कारण ते सैनिक आहेत, दहशतवादी नाहीत. त्यांनी मरण काय असते आणि जगणे कशाला म्हणतात, हे जवळून पाहिले असते. सैनिकांना राग येत असावा, जेव्हा समाचार वाहिन्या त्यांची मुलाखत घेतात तेव्हा तो त्यांच्या डोळ्यातूनही तो दिसतो. वीररस त्यांच्या नसानसात भिनलेला असतो, हे वेगळे सांगायला नको. भयानक भीती वाटावी, अशी समस्या सीमारेषेवर आज असू शकेल. पण, मी तर म्हणेन भयावर मात करून, कसे तयारीत राहायचे ही बघण्यासारखी गोष्ट ठरेल.
पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी त्यांनी बिभित्सपणे निर्घृण हत्या पाहिली असेल पण, त्यानंतर त्यांच्या रोमारोमात संताप संचारला असेल. त्यातही त्यांनी संयम बाळगला आहे. एका सुंदर आणि शांत भारताची कल्पना करत, प्रार्थना करत ते झोपी जात असतील. भारतीय सैनिक प्रत्येक भारतीयाच्या प्रेरणास्थानी आहेत. ते आयुष्य पूर्ण जगतात कारण, वरील गोष्टी नोंदवल्याप्रमाणे ते नवरस आयुष्य जगतात आणि म्हणूनच, लहान मुलेसुद्धा कोणाला सैनिकांची भूमिका करायची आहे रे? असे विचारल्यावर 90 टक्के मुला-मुलींचे हात वर येतात. जरी युद्धभूमीवर जाऊन लढू शकले नाही, तरी राष्ट्रभक्तीची भावना जागरूक होऊन, रंगभूमीवर अगदी पेटून उठलेला अभिनय ते करतात. ते परराष्ट्रीय सैन्य दलाशी लढत असतात पण, रंगभूमीवर त्यांनी त्यांच्या आतल्या शत्रूला, कधीच ठार मारलेले असते. रॅडी, मी असा झोपून मारण्याचा अभिनय करतो, नको रॅडी, मी डोंगरावर चढून मारतो. जर मी मेलोच, तर पडताना प्रेक्षकांना मी वरून पडल्याने जास्त वाईट वाटेल; कारण विक्रम बात्रा मरताना रडायला आलेच पाहिजे अशी वाक्ये लहान मुले जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या भावना मी समजून घेते. दुःख, नैराश्य, त्याग, यातना या सगळ्याची ओळख त्यांना, यानिमित्ताने होत असते. मनातली भीती, दडपण, नैराश्य, शारीरिक अवघडलेपणा वगैरे, भूमिकेच्या निमित्ताने नाहीसे झालेले असतात आणि भारतीय सैन्य विषयीचा अभिमान आणि भारतविषयीचे प्रेम जागरूक होते ते वेगळेच.
नुकताच आमचा रामायणावर आधारित ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालमहानाट्याचा प्रयोग झाला. त्यात 75 मुलांची वानरसेना होती. प्रयोग उत्तम झाला. पण, पहलगामची घटना घडल्यानंतर, एका मुलीचा मला मेसेज आला. ”आपल्या नाटकाचा विषय लक्षात घेता, खवळलेली देशद्रोही प्रवृत्ती असलेली काही माणसे आपल्या समाजात आहेत, त्यामुळे काही होणार तर नाही ना?” असा काळजीवजा भीतीपोटी टाकलेला मेसेज बघता, मी तिला उत्तर दिले. “तुम्ही म्हणता तसे सतर्क राहणे योग्य. पण, एक लक्षात घ्या आमची रामसेना आहे, भ्यायचे ते समोरच्यांनी. आम्ही आमच्या रंगभूमीला युद्धभूमी समजून पराक्रम गाजवणारच. प्रेक्षकांची मने जिंकणार आणि राहिला प्रश्न शत्रूंचा तर, त्यांचे रंग फिके पडत चाललेले आहेत. त्यांची अधोगती निश्चित आहे आणि रंगभूमीवरचे रंग अधिक खोल होताना मला दिसत आहेत.” परत लवकरच भेटू नवीन शौर्यगाथा घेऊन बालरंगभूमीवर.!
रानी~राधिका देशपांडे
7767931123