- उत्तर भारतही अनुभवणार हिंदवी साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास
- दिल्लीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचा प्रकल्प
26-Apr-2025
Total Views | 43
नवी दिल्ली: पार्थ कपोले ( Shivacharitrashri delhi )छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्य, स्वराज्याचे साम्राज्यात झालेले रुपांतर आणि मराठ्यांच्या टाचांखाली आलेली दिल्ली हा इतिहास महाराष्ट्रातील घराघरात माहिती आहे. मात्र, देशाची राजधानी दिल्ली आणि प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये छत्रपतींचा इतिहास म्हणावा तसा अद्याप पोहोचलेला नाही. मात्र, हा इतिहास एका आगळ्यावेगळ्या संग्रहालयाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना बघण्याची आणि समजून घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. त्यासाठी दिल्लीत १९८१ सालापासून कार्यरत असलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट’ने पुढाकार घेतला आहे.
नवी दिल्लीत कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया परिसरात ट्रस्टची २० हजार चौरस फूट अशी भव्य वास्तू आहे. या वास्तूमध्येच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरॅक्टिव्हल पद्धतीने शिवचरित्र दाखविणारे संग्रहालय उभे राहत आहे. पुण्यातील आंबेगावस्थित शिवसृष्टीप्रमाणेच दिल्लीचे हे संग्रहालय असणार आहे.
यामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, देवगिरीचे यादव, शिवजन्म, स्वराज्याची स्थापना, अफजलखान वध, खांदेरी – उंदेरी लढाई आणि इंग्रजांच्या आरमाराचा स्वराज्याच्या आरमाराने केलेला पराभव, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, शिवराजनिती हे आणि असे विविध प्रसंग तंत्रज्ञानाचा वापर करून दाखविण्यात आले आहे. हे संग्रहालय आता अंतिम टप्प्यात असून लवकरच ते जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. हे संग्रहालय गार्डन मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे उभारले जात आहे.
ट्रस्टची स्थापना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कल्पनेनुसार झाली होती. देशभरात शिवचरित्राचे विविध पैलू पोहोचविणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यानुसार १९८१ सालापासून ट्रस्ट विविध माध्यमातून तो उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्याचा संग्रहालयाचा प्रकल्पही त्याच भावनेतून सुरू आहे. या संग्रहालयाद्वारे प्रामुख्याने दिल्लीत येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही शिवचरित्र जाणून घेता येणार आहे.
शिवचरित्र जागतिक पातळीवर नेण्याची संधी – संजय दाबके, संचालक, गार्डन मिडिया अँड एंटरटेनमेंट
दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्राहालय उभारणे हे आमच्यासाठी आव्हान होते. कारण, दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना शिवचरित्राविषयी मराठी माणसाप्रमाणे माहिती नाही. त्यामुळे त्यांना समजेल अशा पद्धतीनेच संग्रहालयाची रचना आम्ही केला आहे. यासाठी आम्ही थ्रीडी फिल्म, अत्याधुनिक थिएटर, शिवचरित्राची सफर घडविणारी डार्क राईड आणि उपलब्ध सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने येथील हे संग्रहालय शिवचरित्रास जागतिक पातळीवर नेण्यास आणखी बळ देईल.