येशूच्या नावाखाली...

    26-Apr-2025
Total Views |
 
In the name of Jesus whom and why is all this conversion
 
 
ख्रिश्चन धर्म आणि त्याची मिशनरी यंत्रणा जगभरात दयाळू येशूची शिकवण घेऊन कार्यरत असते. त्यांच्या प्रचाराचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, इतर धर्मांतील प्रथा, श्रद्धा, परंपरांवर टीका करत, खरा मार्ग म्हणून येशूच्या शिकवणीचा पुरस्कार करणे. हे करताना त्यांच्या भाषेत जरी समोरच्याविषयी सहानुभूती असली, तरी नजरेत उपहासच असतो. मात्र, हाच धर्म जेव्हा आपल्या अंतर्गत संस्थात्मक अधःपतनाच्या कड्यावर उभा असतो, तेव्हा प्रश्न निर्माण होतो हे सारे धर्मांतरण कोणासाठी आणि का?
 
घटना अशी घडली आहे की, नुकतेच पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. लवकरच त्यांचा दफनविधी पार पाडला जाणार आहे. दफनविधी करण्यासाठी जगभरातून नऊ कार्डिनलची निवड करण्यात आली. त्यामध्ये लॉस एंजेलिसचे निवृत्त आर्चबिशप कार्डिनल रॉजर महोनी यांची नियुक्ती झाल्याने, नव्या वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक निवृत्तीमुळे त्यांनी या दफनविधीत सहभागी होऊ नये, अशी ख्रिश्चन धर्मीयांची अपेक्षा आहे.
 
मात्र, ज्येष्ठत्वामुळे महोनी यांची निवड झाल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या चर्चांमध्ये एक आगंतुक मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे, महोनी आणि त्यांच्या सहकारी पाद्रींवर असलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप! 1985 ते 2011 सालापर्यंत लॉस एंजेलिस आर्चडायोसीजचे नेतृत्व करणारे महोनी यांनी व पाद्री यांनी केलेल्या लैंगिक शोषणााबद्दल वारंवार माफी मागितली आहे. 2013 साली चर्चच्या अंतर्गत नोंदींवरून असे दिसून आले की, 1980 सालच्या दशकात ते गैरवर्तनाच्या आरोपाखाली असलेल्या पाद्रींना काढून टाकण्यात आणि कायदा अंमलबजावणीशी सहकार्य करण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे, अशा व्यक्तीची नियुक्ती निवृत्तीनंतर पुन्हा करणे म्हणजे, या सार्‍या प्रकाराला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे अनेक ख्रिश्चन धर्म अनुयायांचे म्हणणे आहे. तसेच, ही बाब संपूर्ण व्यवस्थेच्या नैतिक दिवाळखोरीची साक्ष आहे.
 
ख्रिश्चन मिशनरी व्यवस्था ही जगभर सेवा, करुणा आणि प्रेम या मूल्यांची शिकवण देत असते. पण, 1 हजार, 700 हून अधिक पाद्री आणि चर्चमधील सदस्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होणे, हे त्या मूल्यांना अपवित्र करणे नव्हे का? भारतामध्येही अशा घटना अपवाद नाहीत. केरळमधील सिस्टर अभया प्रकरण, पाद्र्यांनी केलेल्या बलात्काराच्या घटना, नन्सचे मानसिक शोषण, या सगळ्यांमुळे पाद्रींचा मुखवटा फाटलेला दिसतो. काही पाद्र्यांना शिक्षा झाली, पण ही फक्त निवडक बाबच म्हणावी लागेल. एकूणच संस्था पातळीवरच, पाप लपवण्याची एक संस्कृती तयार झाली आहे.
 
या सगळ्याचे गांभीर्य ओळखून पोप फ्रान्सिस यांनी, स्वतः लैंगिक अत्याचाराच्या समस्येला मान्यता दिली होती. त्यांनी काही सुधारणा सुरूही केल्या. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर हा लढा अधांतरीच राहिला आहे. आता नव्या पोपसमोर हे संकट अधिक गडद झालेले आहे. कारण, प्रश्न केवळ वैयक्तिक अपराधाचा राहिलेला नसून, संस्थेच्याच संगनमताचा आहे. अधिक गंभीर बाब ही आहे की, मिशनरी धर्मप्रसारक इतर धर्मांवर प्रश्न उपस्थित करताना, स्वतःच्या धर्मातील पाप त्यांना दिसत नाही. ‘येशू दयाळू आहे’ या वाक्याच्या आधारे हेच लोक लैंगिक शोषण करणार्‍यांना नवे पद देतात, त्यांना संरक्षण देतात, हा फक्त विरोधाभासच नाही, तर येशूच्या शिकवणीचाही अपमानच आहे.
 
या सगळ्यातून एक चित्र स्पष्ट होते आहे की, ख्रिश्चन धर्मसंस्थेमध्ये आज जो पवित्र पदरी दिसतो, तो भोगवादी व्यवस्थेचा केंद्रबिंदू झालेला आहे. गोपनीयता, सत्ता, श्रद्धा आणि भक्ती या सगळ्यांचा गैरवापर करून पाप केले जाते आणि त्या पापांचे समर्थनही होते. हेच मिशनरी जेव्हा इतर धर्मांच्या देव-देवतांवर उपहास करतात, तेव्हा त्यांची नैतिक भूमी आधीच कोसळलेली असते. येशूच्या नावावर जे काही केले जाते, ते त्याच्या शिकवणीच्या उलट आहे. अखेर प्रश्न हा नाही की, पाद्री चुका करत आहेत. प्रश्न आहे चर्च संस्था त्या चुका लपवते का, प्रोत्साहन देते का? आणि दुर्दैवाने उत्तर ‘होय’ असेच आहे. कार्डिनल रॉजर महोनी यांची नियुक्ती हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे.
 
ख्रिश्चन धर्मसंस्थेच्या नव्या नेतृत्वासमोर हे आव्हान मोठे आहे. जेव्हा मिशनरी यंत्रणा दुसर्‍या धर्मांकडे बोट दाखवतात, तेव्हा त्यांनी लक्षात घ्यावे, बाकी चार बोटं स्वतःकडे वळलेली असतात आणि त्यानुसारच आज जग त्यांना विचारू लागले आहे ‘तुम्हाला पवित्र का म्हणावे?’
 
- कौस्तुभ वीरकर