दलित हिताच्या नावे तेढ पसरवणाऱ्यांना ओळखा - गुरूप्रकाश पासवान
- वसाहतवादी दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिण्याचे षडयंत्र - डॉ. उमेश कदम
26-Apr-2025
Total Views | 16
नवी दिल्ली, देशात सध्या दलित हिताच्या नावाखाली काही घटक समाजात तेढ पसरविण्यात आघाडीवर आहे. अशा घटकांचा अजेंडा वेळीच ओळखणे आवश्यक आहे, असे मत लेख आणि कायद्याचे अभ्यासक गुरूप्रसाद पासवान यांनी शनिवारी व्यक्त केले.
भूमिका प्रकाशनातर्फे ' १ जनवरी १८१८ - कोरेगाव भीमा लडाई की वास्तविकता' या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे करण्यात आले. यावेळी लेखक आणि कायदेतज्ञ गुरूप्रकाश पासवान, जेएनयूचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम आणि पुस्तकाचे लेखक ॲड. रोहन जमादार माळवदकर उपस्थित होते.
यावेळी गुरूप्रकाश पासवान म्हणाले, पुराव्यासह बोलणे आणि लिहिणे हे अतिशय महत्वाचे असते. लेखक माळवदकर यांनी आपल्या पुस्तकात उपलब्ध पुराव्यांचा संदर्भ दिला आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात संदर्भाना अतिशय महत्वाचे स्थान आहे. या पुस्तकाद्वारे नव्या विचारांचा उदय झाला आहे, यावर वाद - चर्चा होणे आवश्यक आहे. लेखक रोहन माळवदकर हे जयस्तंभाचे वंशज आहेत, त्यामुळे त्यांनी या विषयावर लिहिण्यास महत्व प्राप्त होते. सध्या दलितांच्या हिताचे नाव घेऊन समाजात तेढ पसरवणारी इंडस्ट्रीच कार्यरत आहे. मात्र, त्यांना अशी ठेकेदारी करण्याचे कोणी सांगितले; असा सवाल विचारणे आवश्यक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकांचाही विपर्यास करण्याचे प्रकार होतात. त्यांच्या लिखाणांचा सोयीस्कर वापर विशिष्ट घटक सातत्याने करत असतात. अनेकदा ब्रेकिंग इंडिया हाच अजेंडा असणारे घटक दलितांना हिंदूंपासून वेगळे दाखवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यातूनच 'जय भीम जय मीम' अशी घोषणा तयार केली जाते. त्यामुळे अशा ठेकेदारांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे, असेही पासवान यांनी यावेळी नमूद केले.
प्राध्यापक डॉ. उमेश कदम म्हणाले, भारताचा इतिहास वसाहतवादी दृष्टिकोनातून लिहिण्याचे पाप ब्रिटिशांनी केले. त्यामुळे जाणीवपूर्वक 'हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया', 'हिस्ट्री ऑफ मुघल इंडिया' असा इतिहास लिहिला. मात्र, 'हिस्ट्री ऑफ मराठा इंडिया' असा इतिहास लिहिला नाही. यामागे वसाहतवादी षडयंत्र होते. त्याद्वारे भारताला अशांत करण्याचे षडयंत्र रचले जाते. देशात १९६५ नंतर फुटीरतावादी चळवळींना बळ मिळाले. त्याच्या मुळाशी १९६५ नंतर शिकवण्यात येणारा इतिहास कारणीभूत होता का, याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सर्व स्तरातून वसाहतवादी विचारांना हद्दपार करणे आवश्यक आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून समाजाने प्रेरणा घ्यावी, असेही डॉ. कदम यांनी यावेळी नमूद केले.
पुस्तकाचे लेखक ॲड. रोहन जमादार माळवदकर यांनी म्हटले की, १८१८ ची लढाई मध्ये माझे पूर्वज लढले आहे. ही लढाई जातीय नव्हती किंवा जातीअंतासाठी लढलेली नव्हती, इंग्रज विरुद्ध मराठा अशी निव्वळ राजकीय लढाई होती व दोघांच्याही सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते. इंग्रजांकडून या लढाई चे नेतृत्व इंग्रज अधिकाऱ्यांनीच केले होते व लढाई तसेच जयस्तंभ संदर्भात अस्सल प्राथमिक अहवाल व कागदपत्र उपलब्ध आहेत. परंतू या लढाईला काही फुटीरतावादी गट हेतुपुरस्सर जातीय रंग देऊन समजात फूट पाडत आहे. राज्यात २०१८ साली एल्गार परिषद आयोजित करून देशविरोधी घटकांना एकत्र आणून दंगल घडवली होती, असेही ते म्हणाले.