"शरद पवारांनी मतांच्या लांगूलचालनासाठी..."; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर
26-Apr-2025
Total Views |
नागपूर : शरद पवारांनी मतांच्या लांगूलचालनासाठी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. पहलगाम येथील हल्ल्यावर शरद पवारांनी केलेल्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "किमान शरद पवारांनी असे वक्तव्य करू नये. त्यांनी ज्यांच्या नातेवाईंकांचा जीव गेला त्या पर्यटकांना काय विचारून जीव घेतला हे जाऊन विचारावे. शरद पवारांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. राष्ट्रावर इतका मोठा आघात झाला असून त्यात २८ लोकांचा जीव गेला. हल्ला करताना आतंकवाद्यांनी काय बोलून त्यांचा जीव घेतला हे पवार साहेबांनी विचारावे. त्यांनी मतांच्या लांगूलचालनासाठी राजकारण करू नये," असे ते म्हणाले.
"पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी केंद्र सरकारने डेडलाईन दिली असून त्या वेळेत त्यांना देश सोडावाच लागेल. भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणाऱ्यांची वृत्ती मोडून काढली पाहिजे. त्यामुळे पंतप्रधानांनी घेतलेली पाकिस्तानचे लोक चले जाओ ही भूमिका महत्वाची आहे," असेही ते म्हणाले.