नुकताच युपीएससीचा निकाल लागला आणि त्यात अनेक तरुणांनी यश मिळविले. यावेळी या यशाची तशी दखल घेण्याचे विशेष कारण म्हणजे, आपल्या देशात शिक्षण आणि कौशल्य याचा उपयोग करून, आपल्या देशातील बुद्धिमत्तेला जगात मागणी वाढत असल्याचे, गेल्या दोन दशकांत आढळून आले आहे. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असली, तरी अशा कौशल्याला आणि या उद्याचे भविष्य असणार्या तरुणाईला, राष्ट्रहितासाठी उपयोगात आणायचे सोडून बहुतांशरित्या त्यांची दिशा भरकटविली जाते. असेच दिसते. दुर्दैवाने याचे परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागतात, ही शोकांतिकाच आहे. हा विषय येथे घेण्याचे प्रयोजन हेच की, यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असलेल्या यमगे गावातील बिरदेव सिद्धप्पा डोणे या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने युपीएससी परीक्षेत मिळवलेले यश, हे अत्यंत प्रेरक असेच आहे. प्रस्थापित माध्यमांनी नसेल, मात्र छोट्या-छोट्या माध्यमांनी या तरुणाच्या यशाची दखल घेत, जे कौतुक केले ते खूप अभिमानास्पद आणि आपल्या देशातील समाजात दिशा भरकटत जाणार्या तरुणांसाठी खूप आशादायक असे आहे.
या यशानंतर बेळगाव पोलिसांनी त्याला चक्क बोलावून घेतले आणि त्याचे अभिनंदन केले. या निकालानंतरचे हे जे काही छोटे-छोटे प्रसंग आहेत, ते आगामी पिढ्यांनी खरोखरच दखल घ्यावे इतके महत्त्वाचे वाटतात. बिरदेव यांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगताना या यशाला गवसणी घातली ती लक्षात घेतली, तर आजदेखील शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणार्या तरुणाईला जी स्वप्न पडतात, ती प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग बिरदेवने प्रशस्त करून दिला आहे. तरीही जी दुसरी बाजू आहे तीदेखील गांभीर्याने घ्यायला हवी. हातात कोयते आणि रात्री दारूच्या बाटल्या घेऊन हिंडणारी ही भरकटलेली तरुणाई बिघडता कामा नये, ही जबाबदारी जितकी पालकांची आहे, तितकीच समाजाची आहे. त्यात सामाजिक दायित्व निभावणार्या समाज घटकांची जास्तच आहे. केवळ त्या आडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आपली पोळी शेकणार्या भोंग्यांनी, ही बाबत नक्कीच लक्षात घेतली पाहिजे.
सावधगिरी
विपरीत परिस्थितीत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एकीकडे बिरदेवसारखे तरुण देशसेवेसाठी सज्ज होत असताना, दुसरीकडे मात्र आपल्या देशातील नंदनवन असलेल्या काश्मीरवर डोळा ठेवणारी तरुणांची जमात, अतिशय घातक असे पायंडे पाडत आहे. आपल्या शेजारचे राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला, काश्मीरमध्ये शांतता नांदलेली कधीच पाहावत नाही. तेथील प्रगतीची शिखरे त्यांना नकोशी वाटतात; मग त्यांच्या क्रूर मानसिकतेतून, वृत्तीतून ते त्यांच्या देशातील तरुणांसोबत आपल्याच भारतभूमीवरील तरुणांना अतिरेकी कारवायात अडकविण्याचे कारस्थान रचतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पहलगाममधील काल-परवाचे भीषण वास्तव यापेक्षा वेगळे नाही. काश्मीरमधील तरुणाईला हातीशी धरूनच हे कारस्थान रचण्यात आले. ज्या विश्वासाने आनंद उपभोगण्यासाठी आपले बांधव तेथे गेले होते, त्यातील काहींना नाहक अशा अतिरेकी तरुणाईच्या कारवायांना बळी पडावे लागले, हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. संतापजनक यासाठी की, काश्मीरमध्ये ‘कलम 370’ हटविल्यानंतर तेथील नागरिकांना मुक्तपणे व्यापार, उद्योग आणि रोजगार मिळावा म्हणून वातावरण निर्मिती करण्यात आली.
तथापि, तेथील लोकांना आमिष दाखवून पाकिस्तानचे समर्थन घेत, काश्मीरमध्ये अशांतता नांदविणार्यांनी हे वातावरण पुन्हा दूषित करण्यास प्रारंभ केला की काय? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित करायला वाव आहे. त्यात काश्मीरमधील स्थानिकांना हाताशी धरून जर हे दुष्कृत्य करण्याचा पायंडा पाडला जात असेल, तर ते भविष्यासाठीही अतिशय घातकच. निदान काश्मीरातील नागरिकांनी तरी आपण भारतीय आहोत आणि भारतभूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असल्याची जाणीव ठेवून, दहशतवाद्यांना हुसकवून लावले पाहिजे. मात्र, ही घटना घडल्याने असे काहीही घडलेच नाही, एकीकडे बुद्धिवान तरुण देश उज्ज्वल भविष्याकडे नेत असताना, काश्मीरमध्ये जर नेमके उलट राक्षसी कृत्य होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. स्थानिक लोकांचा जर या कृत्यात सहभाग आढळून येत असेल, तर नक्कीच आपण सर्वांनी यापासून सावधगिरी बाळगत, अशा विश्वासघातक्यांना या देशातून हद्दपार केले पाहिजे.
- अतुल तांदळीकर