मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला (turtle nest in kihim). ४ मार्च रोजी या किनाऱ्यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते (turtle nest in kihim). या घरट्यामधून शुक्रवारी बाहेर पडलेली ६८ पिल्ले कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने समुद्रात रवाना केली. (turtle nest in kihim)
राज्याच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या उत्तरेकडील किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी प्रामुख्याने आढळतात. मात्र, ४ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील किहीमच्या किनाऱ्यावर सागरी कासवाचे घरटे आढळून आले. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या मादीने भर उन्हात लोकांच्या समक्षच किनाऱ्यावर खड्डा करुन त्यात अंडी घातली होती. कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाकडून हे घरट संरक्षित करण्यात आले होते.
संरक्षित केलेल्या या घरट्यामधून शुक्रवारी साधारण ५० दिवसांनी पिल्लांचा जन्म झाला. शुक्रवारी सकाळी आणि त्यानंतर सायंकाळी बाहेर पडलेल्या ६८ पिल्लांना वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने समुद्रात सोडले. हे घरटे इन-सेटू पद्धतीने संरक्षित करण्यात आले होते, म्हणजेच अंड्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याभोवती जाळी लावून घरट्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यात नेमकी अंडी होती आणि त्यातून अजून किती पिल्लं बाहेर पडू शकतात याचा अंदाज देता येता नाही, असे कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.