बदला... द रिव्हेंज

    25-Apr-2025
Total Views | 9
 
morale of Congress workers
 
वरील मथळा एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाला साजेसा असला, तरी प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमधल्या घडामोडींना तंतोतंत लागू पडतो. विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचे पुरते मनोबल खचले. त्यातून सावरण्याची ताकद मिळते ना मिळते तोच ‘हायकमांड’ने हर्षवर्धन सपकाळ यांना कार्यकर्त्यांच्या माथी मारले. भलेभले इच्छुकांच्या रांगेत असताना, केवळ राहुल गांधींचे लाडके म्हणून सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले.
 
ते कोणाचेच प्रतिस्पर्धक नसल्याने इच्छुकांचा राग मावळेल, पक्षाला शिस्त लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. एकापाठोपाठ एक मोहरे गळायला लागले. रवींद्र धंगेकर यांनी सुरुवात केली. धग हळूहळू पश्चिम महाराष्ट्रभर पोहोचायला लागली. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत भाजपमध्ये प्रवेश केला.
थोपटे म्हणजे कोणी सामान्य कार्यकर्ता नव्हे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांच्या कुटुंबाने काँग्रेससाठी कष्ट घेतले. वडील 30 वर्षे आणि ते स्वतः 15 वर्षे आमदार होते.
 
अशावेळी पक्षाकडून मोठ्या जबाबदारीची अपेक्षा बाळगणे गैर नव्हते. परंतु, प्रत्येक पातळीवर त्यांना डावलण्यात आले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मंत्रिपदाचे गाजर दाखवून हाती धुपाटणे मिळाले. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यानंतर तेथे संधी देण्याचे आश्वासनही फोल ठरले. प्रदेशाध्यक्ष पदाचे आमिष दाखवत, हिरमोड करण्यात आला. थोपटे वरचढ होऊ नये, यासाठी स्वपक्षातून आणि मित्रपक्षातून सुरू असलेल्या कुरघोडींना कंटाळून शेवटी संग्रामरावांनी काँग्रेस त्यागली. ते आता भाजपत गेले असले, तरी बदल्याची आग अजून थंड झालेली नाही.
 
ज्यांच्यामुळे करिअरला ब्रेक लागला, त्यांना आणि ज्यांच्यासाठी इतके करूनही डावलण्यात आले, त्यांना धडा शिकवण्याचा जणू त्यांनी चंग बांधलाय. येत्या काळात त्याचे दृष्य परिणाम अनुभवायला मिळतील. ताज्या माहितीनुसार, काँग्रेसमधील किमान तीन माजी आमदार लवकरच पक्षांतर करतील. नगर पट्ट्यातील एका विधान परिषद आमदाराने थोपटेंच्या हाकेला ओ दिला आहे. वरिष्ठांकडून ‘ओके’ मिळाल्यानंतर त्याच्या हातात भगवा दिसेल. आता थोपटेंची ही ‘रिव्हेंज’ मालिका इथवर थांबते, की काँग्रेसला आणि खिळखिळी करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
गिरे तो भी टांग उपर!
 
उथळ पाण्याला खळखळाट फार’ असे म्हणतात. खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग! या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. त्याही पलीकडे जात, संरक्षण खर्चात कपात करून तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचे विधान त्यांनी केले. वास्तविक, धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या दहशतवादी कृत्याचा राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाने निषेध नोंदवणे क्रमप्राप्त होते.
 
पण, त्यात त्यांनी लांगूलचालनाची संधी शोधली. समाजाला विभाजित करण्याच्या आणि देशात फूट पाडण्याच्या या जिहादी प्रयत्नांना बहुधा उबाठा गटाचे समर्थन असावे. म्हणूनच त्यांच्या पक्षप्रमुखाने साधे निषेध नोंदवणारे ट्वीट करण्याचे औदार्य दाखवले नाही. असो! त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ!
 
पण, संरक्षण खर्चात कपात करून तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचा दावा संजय राऊतांसारख्या संपादकाने करणे म्हणजे अगदीच हास्यास्पद. संरक्षण विभाग हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि ‘लाडकी बहीण योजना’ हा विषय राज्याच्या अधिकारक्षेत्रात. त्यामुळे या योजनेसाठी संरक्षण खात्याचा निधी कोणत्या मार्गाने वळवला, याचे पुरावे त्यांनी सादर करावे, अन्यथा या दिशाभूल करणार्‍या विधानांबाबत माफी मागावी. पण, तेवढे सौजन्य ते दाखवणार नाहीत. कारण, मग त्यांना आपले दुकानच बंद करावे लागेल. अमित शाह यांचा ‘अपयशी आणि अपशकुनी गृहमंत्री’ असा उल्लेखदेखील राऊतांनी केला. सरकारे पाडण्यात गुंतलेल्या शाहंचे देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही, असे त्यांचे म्हणणे.
 
राऊतांचे डोके कधी ठिकाणावर नसते, तसे ते पण, भारताचे आजवरचे सर्वांत यशस्वी गृहमंत्री असा ज्यांचा उल्लेख जगभरात केला जातो, त्यांच्याविषयी असे उद्गार काढायला यांची जीभ कचरतेच कशी? लांगूलचालनाच्या नादात राऊत आणि त्यांचा पक्ष कोणत्या थराला जातो आहे, याचे भान त्यांनी बाळगावे. दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधीच सुरू झालेला हा राजकारणाचा पोरखेळ थांबवा राऊत!
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121