मिळाली पावसाच्या आगमनाची वर्दी; कोकणात 'नवरंग'चे आगमन

    25-Apr-2025
Total Views |
indian pitta migration




मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)
 
 
भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. 'पिट्टा' हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ 'लहान पक्षी' असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.
 
 
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.