म्हाडा मास्टर लिस्टवरील १०५ रहिवाशांची सोडत संपन्न

    25-Apr-2025
Total Views |
 
draw for 105 residents on the MHADA master list has been completed
 
मुंबई: ( draw for 105 residents on the MHADA master list has been completed ) ‘म्हाडा’च्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहतसूचीवरील पात्र मूळ भाडेकरू, रहिवासी यांना देण्यात येणार्‍या जुन्या निवासी गाळ्याच्या मूळ अनुज्ञेय क्षेत्रफळाव्यतिरिक्त जास्त क्षेत्रफळाकरिता आकारण्यात येणार्‍या 110 टक्के रकमेऐवजी 100 टक्के रकमेची आकारणी करण्याबाबतचा निर्णय ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’चे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी गुरुवार, दि. 24 रोजी जाहीर केला.
 
हा निर्णय डिसेंबर 2023 साली काढण्यात आलेल्या सोडतीतील पात्र भाडेकरू, रहिवासी यांनादेखील पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. याबाबत नवीन नियमावली दि. 28 एप्रिल रोजीपर्यंत तयार करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधितांना दिले. ‘म्हाडा’च्या ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’तर्फे ‘बृहतसूची समिती’द्वारे उपकरप्राप्त इमारतींमधील 105 पात्र भाडेकरू व रहिवासी यांना कायमस्वरूपी सदनिकांचे वितरण करण्यासाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. वांद्रे (पूर्व) येथील ‘म्हाडा’ मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली. यावेळी जयस्वाल बोलत होते.
 
जयस्वाल म्हणाले की, “जीर्ण, धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा तळमजला सोडून वरील मजले पाडले जातात. तळमजल्यावरील भाडेकरू, रहिवासी यांना अपात्र ठरविले जात होते. नवीन नियमावलीत जीर्ण, धोकादायक उपकरप्राप्त इमारतीतील तळमजल्यावरील भाडेकरू, रहिवासी यांनादेखील पात्र करून बृहतसूचीमध्ये त्यांचा समावेश करण्याबाबत धोरण तयार करावे.” मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत.
 
शासन निर्देशानुसार ‘म्हाडा’मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यातील ‘अ’ वर्गातील मूळ रहिवाशी ज्यांच्या इमारतीचा पुनर्विकास होऊ शकत नाही, अशा भाडेकरू/रहिवासी यांची पात्रता निश्चितीसाठी विशेष मोहीम राबवून त्यांना बृहतसूचीवर समाविष्ट करण्याबाबत नवीन नियमावलीत धोरण तयार करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, ‘म्हाडा’च्या सचिव नीलिमा धायगुडे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर, उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे, उपमुख्य अधिकारी मोहन बोबडे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.