गेली 39 वर्षे पुणेकरांमध्ये योगसाधनेची आवड निर्माण करणार्या योगप्रशिक्षक तृप्ती आडके यांच्याविषयी...
भारतीय संस्कृतीत योगसाधनेचे महत्त्व आजकाल अधिकच पटू लागले आहे. आरोग्याच्या तक्रारींवर रामबाण उपाय असलेली ही क्रिया, सर्वसामान्यांपासून ते समाजातील प्रत्येक घटकांसाठी उपयुक्त मानवी जीवनात जितके शिक्षणाला महत्त्व, तितकेच आता या योगसाधनेलादेखील प्राप्त होत आहे; हे याकडे वाढत असलेला योगसाधकांचा कल आणि त्यांना प्रशिक्षित करणार्या योग गुरूजनांचा प्रामाणिक प्रयास लक्षात घेतला तर पटू लागते.
ॐ योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलि रानतोऽस्मि॥
या श्लोकाने पुण्यातील या योगाश्रमाची रोज सकाळी सुरुवात होते आहे.
पुण्यातील भवानीपेठेत एका सधन आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या तृप्ती यांचे बालपण, आनंदात गेले. शाळेत असताना त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेत, योगसाधना करायला सुरुवात केली. मग काय, योगासनांची आवड निर्माण झाल्याने, तृप्ती यांच्यासाठी योगासने ही ‘पॅशन’च झाली. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी आंतरशालेय स्पर्धेत भाग घेत, ही आवड किती उपयुक्त आणि सार्थ आहे, हे दरवर्षी शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देत सिद्ध केले.
त्या इयत्ता नववी शिकत असताना त्यांची देशभरातून निवड झाली आणि ‘भारतीयम्’ या कार्यक्रमासाठी त्यांची प्रात्यक्षिके दिल्ली येथे, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासमोर झाली. दहावीनंतर तृप्ती यांनी ‘बीकॉम’ केले. पण, वडिलांना फक्त पदवी मान्य नव्हती. त्यांच्या मते, आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. त्यामुळे सर्वांत मोठी बहीण ‘कमर्शियल आर्टिस्ट’ होत होती, तर दुसरी बहीण वैद्यकीय शिक्षण घेत होती. त्यांचे वडील ‘बीए,एलएलबी’ होते. परंतु, घरचा खूप जुना व्यवसाय सोडून त्यांना वकिली करायची नाही, असे तृप्ती यांच्या आजीने सांगितले होते.
त्यांची वकिलीची पदवी होती, मग तृप्ती यांनादेखील वकिली करायची इच्छा झाली आणि त्यांनी ‘एलएलबी’ केले व कोर्ट प्रॅक्टिस सुरू केले. बारावीनंतर लगेच तृप्ती यांनी योग विद्याधाम, नारायण पेठ पुणे येथे प्रवेश घेतला. मग त्यांचा अविरत योगसाधनेचा प्रवास अखंडित सुरू झाला आणि योग विद्याधाम येथेच योग प्रवेश, योग परिचय या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 1996 साली त्यांनी योगशिक्षक पदासाठीचा डिप्लोमा केला. 2002 साली त्यांचे लग्न झाले. त्यानंतरही पहाटेचे योग वर्ग सुरूच होते. अगदी गरोदर असतानासुद्धा आठव्या महिन्यापर्यंत त्यांचे योगवर्ग सुरू होते.
तृप्ती यांनी विविध ठिकाणी जाऊन, योगासनाचे वर्ग घेतले. त्यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे कोलते पाटील बिल्डर्स, रांका ज्वेलर्सचे मालक, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. केदार कुलकर्णी व डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. लाटकर व कुटुंबीय यांच्या घरी जाऊन योग प्रशिक्षण दिले. त्या काळात नऊ वेळा राष्ट्रीय पातळीवर, योगासन स्पर्धेत त्या सहभागी झाल्या आणि एक वेळा आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत, मलेशिया येथेदेखील त्या सहभागी झाल्या.
2012 सालापासून विविध अडचणींना तोंड देत, मुलाचा सांभाळ करत असताना आपण स्वतःचे असे योग केंद्र सुरू करावे, असे तृप्ती यांना वाटले. तेव्हा बाजीराव मार्गावर भाडेतत्त्वावर जागा घेऊन, 2017 सालापासून ‘योग आश्रम’ ही संस्था त्यांनी सुरू केली. विविध पद्धतींचा अवलंब करून ‘योग अण्डर वन रूफ’ या संकल्पनेतून, वेगवेगळ्या पद्धतीने योग शिकवण्याचा योगा स्टुडिओ सुरू केला. ’वेलकम टू योगाज वर्ल्ड’ अशी टॅगलाईन असलेल्या योगाश्रममध्ये वजन कमी करणे, फिटनेस, प्राणायामाचे विशेष वर्ग, योग थेेरपी बॅचेस सुरू केल्या. कोरोना काळात प्राणायामामुळे अनेक जणांनी त्यांच्या योगाश्रमाचा उपयोग करून घेतला.
त्यामुळे अनेकांना कोविड काळात देखील डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली नाही. आज त्या एरंडवणे येथे स्वतःच्या जागेत योगाश्रम चालवितात. त्यांचा मुलगा तनिषही वैद्यकीय प्रशिक्षण घेत आहे. तोही योगसाधनेमध्ये निपुण झाला व जनतेची सेवा करण्यास सज्ज झाला आहे. ‘सिंबायोसिस विद्यापीठा’नेदेखील त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, तृप्ती यांना नियुक्त केले. त्यांच्या योगकार्याची दखल घेत, पुणे महानगरपालिकेने सन्मानित केले. त्यांना ‘तुळशीबाग गणपती’ तर्फेही पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच, ‘रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट’ तर्फे नवरात्रीनिमित्त नवदुर्गा म्हणून त्यांचा सत्कार झाला. ‘सिल्क रूट एक्झिबीटर्स’ तर्फे ‘यशस्वी उद्योजिका’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
आता तृप्ती यांचा भविष्यात थेरपी-उपचार, वजन कमी करणे-वाढवणे व दोन दिवसाची रहिवासी शिबिरे आयोजित करण्याचा मानस आहे. उल्लेखनीय म्हणजे, तृप्ती आडके यांच्या योगासनाचा नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासही सुरु आहे. त्या गेली 39 वर्षे स्वतः योगासने करून, तसेच जवळजवळ गेली 29 वर्षे सातत्याने विविध ठिकाणी योगाचे प्रशिक्षण त्यांनी दिले. योग फक्त शारीरिक व्यायाम नसून, यामध्ये मन, शरीर व व्यक्तिमत्त्व या सगळ्याचा उत्तम विकास होतो.
बर्याच दुर्धर आजारांवर तृप्ती यांनी काम केले व यशस्वीरीत्या त्या रुग्णांना आजारापासून मुक्ती मिळाल्याचे त्या सांगतात. या क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांची सेवा करता येते, यात खूप मानसिक समाधानही लाभते असे तृप्ती यांना वाटते. पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर योग प्रशिक्षणाचे काम करण्याचादेखील त्यांचा मानस आहे. योगाश्रममध्ये योग शिक्षक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे. तृप्ती आडके यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
- अतुल तांदळीकर