राहुल गांधी उद्या तुम्ही महात्मा गांधींनाही इंग्रजांचे सेवक म्हणाल? राजकीय नेते असून अशी बेजबाबदार विधानं कशी करता? - सर्वोच्च न्यायालय
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघडणी
25-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली (Supreme Court on Rahul Gandhi ): विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
याबद्दल वकील नृपेंद्र पांडे यांनी खटला न्यायालयात तक्रार केली होती. राहुल गांधींनी सावरकरांचा इंग्रजांचे सेवक असा उल्लेख करत पेन्शन घेतल्याचा दावाही केला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने राहुल गांधींना सत्र न्यायालयासमोर जाण्यास सांगितले. यानंतर राहुल गांधींनी अलहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली.
" 'सावरकर ब्रिटीशांचे सेवक आहेत,' या राहुल गांधींच्या वक्तव्यावर न्या. दत्ता यांनी आक्षेप घेतला. न्या. दत्ता म्हणाले की, "महात्मा गांधींनी व्हाईसरॉयला लिहिलेल्या पत्रांमध्ये 'तुमचा विश्वासू सेवक' हा शब्द वापरला म्हणून त्यांना ब्रिटिशांचे सेवक म्हणता येईल का? तुमच्या पक्षकाराला माहित आहे का की, त्यांच्या आजी (इंदिरा गांधी) जेव्हा त्या पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनीही स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांचे कौतुक करणारे पत्र पाठवले होते?," असा खणखणीत प्रश्न न्यायमूर्ती दत्ता यांनी गांधीचे वकील ए. एम. सिंघवी यांना विचारला.
न्या. दत्ता यांनी राहुल गांधींची कानउघडणी करताना म्हटले की, "तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात. तुम्हाला असा गोंधळ निर्माण करायचा आहे का? तुम्ही अकोल्याला जाऊन हे विधान करता, महाराष्ट्रात जिथे सावरकरांची पूजा केली जाते, तुम्ही हे विधान का करता? कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही ब्रिटिशांच्या काळात मुख्य न्यायाधीशांना "तुमचा सेवक" असे संबोधत असत. "कोणीही अशा प्रकारे सेवक बनत नाही. पुढच्या वेळी कोणीतरी म्हणेल की महात्मा गांधी ब्रिटिशांचे सेवक होते. तुम्ही अशा प्रकारच्या विधानांना का प्रोत्साहन देत आहात."
राहुल गांधींना 'सर्वोच्च' इशारा!
"स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय तुम्ही असे विधान करू शकत नाही", असे सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना बजावले. भविष्यात जर राहुल गांधींनी असे विधान केले तर आम्ही सुओ मोटोद्वारे प्रकरणाची दखल घेऊ, असा इशारा न्यायालयाने दिला. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांशी तुम्ही असे कसे वागू शकता?, असे न्या. दत्ता म्हणाले, खंडपीठाने या प्रकरणात राहुल गांधीच्या समन्सला स्थगिती दिली पण भविष्यात अशी विधाने करू नका, असा इशारा न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे. न्यायलयसमोर गांधीचे वकील ए. एम. सिंघवी यांनी तोंडी वचन दिले की पुढे अशी कोणतीही विधाने केली जाणार नाहीत.