वेगाने विस्तारणार्या नवी मुंबईतील वाढत्या गर्दीचे नियोजन आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी, राज्य सरकारने बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर मेट्रो मार्गाची प्राधान्याने अंमलबजावणी केली व त्यासाठी ‘सिडको’ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. ‘सिडको’तर्फे एकूण 25 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजित असून, यांपैकी पहिल्या टप्प्यातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग-1 नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला.
या मार्गाचे परिचालन ‘महा मेट्रो’तर्फे करण्यात येत असून, आर्थिक केंद्रे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, यांमुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन ‘सिडको’ने अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यशस्वी परिचालन आणि भविष्यातील विस्तार
सद्यस्थितीत मेट्रो मार्ग-1 बेलापूर ते पेंधर हा 11.1 किमी लांबीचा मार्ग असून, या मार्गामुळे हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुकर झाला आहे. या मार्गाद्वारे महत्त्वाच्या निवासी आणि व्यापारी केंद्रांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. ‘सिडको’तर्फे 3.02 किमी मार्गाची भर घालून प्रस्तावित मेट्रो-8 सह या मार्गाचा (मेट्रो मार्ग 1ए) सागरसंगम आंतरबदल स्थानक मार्गे बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यलायासमोर विस्तार करणे नियोजित आहे.
नवी मुंबई मेट्रो 2 : पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-4
पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (पेंधर मार्गे पूर्व बाजू) दरम्यान कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो मार्ग-2 नियोजित आहे. या मार्गामुळे वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे.
मेट्रो-8 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळ ते नवी मुंबई
मुंबई मेट्रो मार्ग-8 या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई
मेट्रो मार्ग-8 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2 टर्मिनल स्थानकापासून सुरू होऊन मुंबई विमानतळ ते छेडानगर दरम्यान भूमिगत असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत स्वरूपाचा असणार आहे.
नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो प्रकल्प
नवी मुंबईला शहरांतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पातील विकसित करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर या मेट्रोला प्रवाशांचा पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या मेट्रो मार्गाद्वारे बेलापूर सीबीडी, तळोजा एमआयडीसी, खारघर व तळोजा येथील ‘सिडको’च्या गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली. मेट्रो 2, 3 व 4 यांची अंमलबजावणीदेखील नजीकच्या काळात करण्यात येईल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही पुढील काळात साकारण्यात येणार आहे.
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख फायदे
1) वाहतुकीचा ताण कमी
2) पर्यावरणीय शाश्वतता
3) आर्थिक विकास
4) विमानतळाकरिता वाढीव सुगमता
5) बहुउद्देशीय व सर्वसमावेशक पायाभूत सुविधा
6) बहुउद्देशीय कनेक्टिव्हिटी