दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांचा सरकारला पूर्ण पाठिंबा दहशतवादाविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची केंद्र सरकारची ग्वाही

    25-Apr-2025
Total Views | 12

all parties meeting 
 
नवी दिल्ली (All Party Meeting on Pahalgam): “दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
 
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.
 
बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजमाथ सिंह यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्यरिटी’च्या (सीसीसी) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्सफ ’ धोरण असल्याचा पुनरुच्चार करून संरक्षणमंत्र्यांनी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आणखी कठोर कारवाई करण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट केले.”
 
बैठकीत ‘इंटेलिजन्स ब्युरो’ (आयबी) आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे नेमकी कोठे चूक झाली, याचीदेखील माहिती उपस्थितांना देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी सांगितले. पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी सरकारतर्फे करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती सर्व नेत्यांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या प्रत्येक निर्णयास पाठिंबा असून सर्व पक्ष सरकारसोबत ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी नमूद केले आहे.
 
दरम्यान, बैठकीत हल्ल्याचा सर्व नेत्यांनी निषेध केला आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत उभे असून जम्मू-काश्मीरमध्ये शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अन्य विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे.
 
पाक नागरिकांचे वैद्यकीय व्हिसाही रद्द
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सुरक्षा मंत्रिमंडळ समिती’ने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणारे व्हिसा सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २७ एप्रिल २०२५ रोजीपासून भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेले वैद्यकीय व्हिसा फक्त दि. २९ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत वैध असतील. भारतात सध्या असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा लागेल. भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121