विरार (Vasai-Virar Municipal Corporation): खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात विकासकामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्यासाठी आ. राजन नाईक यांनी खा. डॉ. हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिका, रेल्वे, महामार्ग, ‘महावितरण’ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात वसई बुडू नये म्हणून आमदारांनी पावसाळ्याआधी करावयाची कामे, त्यात नाले सफाई, नाले रुंदीकरण यावर चर्चा झाली. बैठकीबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी माध्यमांना माहिती दिली.
खासदारांच्या प्रशासनाला सूचना
केंद्र सरकारशी निगडीत जी कामे प्रलंबित असतील त्यांची माहिती देण्यात यावी, जेणेकरून या कामांचा पाठपुरावा करून सर्व कामे मार्गी लावता येतील, अशा सूचना खा. डॉ. हेमंत सवरा यांनी आयुक्तांना दिल्या. यावेळी वसई-विरार शहर मनपा आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, आ. राजन नाईक, प्रथम महापौर राजीव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी व अन्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.