"हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर..."; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे विरोधकांना प्रत्युत्तर
25-Apr-2025
Total Views |
नागपूर : पहलगाममधील घटनेनंतर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. यात जो कुणी राजकारण करेल ते त्यांना लखलाभ आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिले आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महायूतीमध्ये कोणताही विसंवाद नाही. एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला जाऊन पर्यटकांची भेट घेणे हे राजकारण नाही. तसेच गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन मंत्री असून त्यांना पाठवण्यातही काहीच राजकारण नाही. जम्मू काश्मीरमध्ये ३ ते ४ हजारांच्या वर असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप घरी आणण्याची आमची व्यवस्था आहे. यात कोणतेही राजकारण नाही. ही घटना श्रेयवादाची नाही. देशाचे फार मोठे नुकसान झाले असून यात जो कुणी राजकारण करत असेल ते त्यांना लखलाभ आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहायला हवा. हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. त्यामुळे या घटनेवर राजकारण करू नये," असे ते म्हणाले.
पुढच्या दोन वर्षात राज्यात ३० लक्ष घरे निर्माण होणार
"कोराडी-खापरखेडा वीज प्रकल्पातील कंत्राटी कामगारांना ५ हजार घरे बांधून देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्यांना स्वस्तात घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत. तसेच कामठी शहरातदेखील अडीच हजार, भिलगाव खैरीजवळ ५ हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील साडे पाच हजार लोकांना लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तयार झालेल्या घरांचे वाटप करणार आहोत. नागपूर शहरात हिस्लॉप कॉलेजजवळ असलेल्या म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच म्हडाच्या माध्यमातून शहरातील सर्व अतिक्रमणे काढून त्यांना घरे देण्याची योजना केली आहे. पुढच्या दोन वर्षात राज्यात ३० लक्ष घरे निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घरे केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतली आहेत. या योजनेत आम्ही सर्वांसाठी घरे वाटप करणार आहोत," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.