सिडकोने ४२ दिवसांत उभारले बहुमजली वाहनतळ

गुणवत्तेशी तडजोड न करता, वेगाने बांधकाम

    25-Apr-2025
Total Views |
CIDCO constructed a multi-storey car park in 42 days

नवी मुंबई, सिडकोतर्फे मिशन ४५ अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम विक्रमी ४२ दिवसांत पूर्ण करण्यात आले. सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ६७,००० सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू असून यातील सदनिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मिशन-४५ अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनेच्या पॅकेज-४ अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्र. ३ वर बहुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळाचे काम ४ मार्च २०२५ रोजी सुरू होऊन १७ एप्रिल २०२५ रोजी पूर्ण झाले. नियोजित वेळापत्रकाच्या ३ दिवस आधी म्हणजे केवळ ४२ दिवसांत या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारच्या पारंपरिक बांधकामाकरिता लागणारा ६ महिन्यांचा कालावधी विचारात घेता साडे चार महिन्यांच्या कालावधीची बचत झाली आहे.

“सिडकोमध्ये आमची मार्गदर्शक तत्वे, तडजोड न करता गुणवत्ता, विलंब न करता गती आणि सर्वांपेक्षा महत्वाची सुरक्षा हीच आमच्या पायाभूत सुविधांच्या बांधणी मागील प्रेरणा आहेत. ‘मिशन ४५’ अंतर्गत करण्यात आलेले सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम हे विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जे आपल्या शहरांचे भविष्य अधिक उज्वल घडवण्यासाठी योगदान देते.”