पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम’वर हल्ला

    25-Apr-2025
Total Views |

bjp vasai
विरार ( BJP Vasai): जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
 
वसई रेल्वेस्थानक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘दहशतवादाचा नाश होवो’, अशा घोषणा देत देशविरोधी कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्याची मागणी केली. पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. देशात राहून देशाविरोधात षड्यंत्र रचणार्या काही राजकीय टोळ्यांचा प्रथम बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम हल्ल्यानंतर तपास सुरू केला आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे हे आंदोलन त्याच भावनेचे प्रतिबिंब असल्याचे दिसून आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, शेखर धुरी, महेश सरवणकर, प्रज्ञा कुलकर्णी, अभय कक्कड, सिद्धेश तावडे, देवेंद्र जेना, जोगेंद्र प्रसाद, प्रसाद चौधरी, बाळा सावंत, मनोज शर्मा, रामानुम सिंग, विनोद सकसेना आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर रॉबर्ट वाड्रांना अल्पसंख्याक आठवतात...
“आपले जवान बलिदान देत आहेत आणि पाकिस्तान मोकळेपणाने दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहे. दहशतवाद विरोधात सरकार कठोर पावले उचलते तेव्हा रॉबर्ट वाड्रासारख्या लोकांना मानवाधिकार आणि अल्पसंख्याक आठवतात. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या अमानवी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे,” असे आवाहन उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले.