महा MTB Exclusive - महाराष्ट्रात प्रथमच आढळला दुर्मीळ पांढरा बिबट्या; 'या' जिल्ह्यात दर्शन

24 Apr 2025 10:33:12
white colored leopard



मुंबई (अक्षय मांडवकर) -
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवार दि. २३ एप्रिल रोजी बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आले (white colored leopard). या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत (white colored leopard). दरम्यान हे पिल्लू 'ल्युकिस्टिक' आहे की 'अल्बिनो' याचा अद्याप उलगडा झालेला नाही. कारण, या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नाही (white colored leopard). मात्र, महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे. (white colored leopard)

रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते. या पिल्लांचे डोळे देखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली. मात्र, शेजारीच असणाऱ्या मादीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेली मंडळी तिथून दूर झाली. त्यांनी यासंबंधीची माहिती रत्नागिरी वन विभागाला उशिराने कळवली. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत मादीने पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवले होते.


विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी गिरीजा देसाई आणि सहा. वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक अरुण माळी, सुरज तेली आणि 'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे प्रतीक मोरे, डाॅ.शार्दुल केळकर, विराज आठले, स्थानिक वन्यजीवप्रेमी ज्ञानेश पाटोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले असून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारे बिबट्याचे पांढरे पिल्लू सापडणे दुर्मीळ आहे. यापूर्वी १९०६ ते १९६५ च्या दरम्यान बिहार आणि मध्यप्रदेशमध्ये पांढऱ्या रंगाचे बिबटे आढळल्याची नोंद आहे. मात्र, महाराष्ट्रात प्रथमच पांढऱ्या रंगाचा बिबट्या आढळून आला आहे.


पांढरा रंग का येतो ?
वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. 'ल्युकिस्टिक' प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी, वन्यजीवांचे डोेळे नियमित रंगाचे असतात. 'अल्बिनो' प्रकारात डोळे लाल दिसतात. रत्नागिरीतील बिबट्याच्या पांढऱ्या पिल्लाचे डोळे अद्याप उघडलेले नसल्याने त्याच्या प्रकाराविषयी माहिती देता येणार नाही.
Powered By Sangraha 9.0