पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सलीम मर्चंट यांची संतप्त प्रतिक्रिया : “मुस्लिम म्हणून मला लाज वाटते”

    24-Apr-2025   
Total Views |


pahalgam terrorist democracy salim merchant public angry reaction I feel ashamed as a muslim
 
 
मुंबई : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असून, बहुतेक पीडित हिंदू होते. या अमानुष घटनेवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
संगीतकार सलीम मर्चंट यांनी देखील इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी म्हटलं, “हे लोक मुस्लिम आहेत का? नाही, ते फक्त दहशतवादी आहेत. कारण इस्लाम कधीच असा हिंसाचार शिकवत नाही.” कुराणातील सूरा अल बकरा, आयत २५६ चा दाखला देत त्यांनी सांगितले की, "धर्मात जबरदस्ती नाही," हे कुराणात स्पष्टपणे लिहिलं आहे.
 
 
 
सलीम पुढे म्हणाले, “मुस्लिम म्हणून मला लाज वाटते की असा काळ पाहावा लागत आहे. माझे हिंदू बंधू-भगिनी केवळ त्यांच्या ओळखीमुळे ठार मारले गेले. ही द्वेषाची श्रृंखला केव्हा थांबणार?”
 
 
 
सलमान खानने देखील X (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं, “कश्मीर – पृथ्वीवरील स्वर्ग – आता नरकात बदलतोय. निरपराध लोकांचा बळी जातोय. माझं मन त्यांच्या कुटुंबांसोबत आहे. एखाद्या निरपराधाला मारणं म्हणजे संपूर्ण मानवतेला मारणं आहे.”
 
 
 
शाहरुख खाननेही आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं, “या कपटी आणि अमानवी कृत्यामुळे शब्दच हरवले आहेत. अशा वेळी देवाकडे प्रार्थना करण्यावाचून दुसरा उपाय नाही. या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. आपण एकजूट राहून या घटनेला न्याय मिळवून दिला पाहिजे.”
 
 
 
पाहलगाम हल्ल्याबाबत अधिक माहिती:
पाहलगाम येथे २२ एप्रिल रोजी संशयित अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, ही देशात गेल्या दोन दशकांतील सर्वात भीषण घटना असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.



 

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.