अद्भुत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या सातार्यातील दर्याखोर्यांमधील जैवविविधतेचे निरीक्षण करून, तेथील रानवाटांचा वाटाड्या बनलेल्या सागर कुलकर्णी यांच्याविषयी...
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच, या व्यक्तीचे पायदेखील पाळण्यातच दिसले होते. मात्र, हे पाय रमले सातार्यातील रानावनातील वाटांवर. जिल्ह्यातील दुर्मीळ जैवविविधतेचा ठेवा जगासमोर उलगडण्याचे काम करणारा हा रानवेडा माणूस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेला. या माणसाने जगासमोर उलगडलेला दुर्मीळ रानफुलांचा ठेवा, हा त्याच फुलांसारखा आकर्षक आहे. सातार्यातील दर्याखोर्यांमध्ये भटकून तिथली जैवविविधता जगसमोर मांडणारा, हा वाटाड्या आहे सागर दिलीप कुलकर्णी.
सागर यांचा जन्म दि. 10 सप्टेंबर 1995 रोजी पुण्यात झाला. मात्र, त्यांची कर्मभूमी सातारा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच काहीसे त्यांच्या बाबतीत झाले. कारण, अगदी चार महिन्यांचा या बालकाने हल्लेखोर गांधीलमाशी चिरडली होती. त्याचवेळी त्यांच्या आईला या बाळाचे पाय, रानावनात भटकणार याची जाणीव झाली आणि झालेही तसेच. लहानग्या सागरला बालवयातच प्राण्यांची आवड जडली. सातार्याच्या परिघात असणारे महादईचे जंगल, अजिंक्यतारा, पेढ्याचा भैरोबासारखे भाग सायकलवरून हिंडायला जाणे, तिथे जाऊन पक्षी बघणे, फुलपाखरांच्या मागे लागून त्यांचा शोध घेणे, असे उद्योग सुरू झाले. शाळेतूनही त्याला खतपाणी मिळाले. न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक हे. गो. देशपांडे यांनी लहानग्या सागरमध्ये प्राणीशास्त्राची आवड रुजवली. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणदेखील प्राणीशास्त्रातच घेण्याचे ठरले.
त्यानुसार ‘यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून, विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण प्राणीशास्त्र विषयातून झाले. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान सागर यांना खर्या अर्थाने रानाची वाट गवसली. त्यांनी फुलपाखरांचा अभ्यास सुरू केला. लहानपणी फुलपाखरांच्या मागे लागून त्यांचा शोध घेणार्यासाठी धावणारे पाय, आता खर्या अर्थाने फुलपाखरांच्या शोधात रानावनात भटकू लागले. या माध्यमातून जवळपास 250 फुलपाखरांची नोंद करत, त्यांची जीवनसाखळी आपल्या कॅमेर्यात कैद केली. सापांची ओळख झाली. पुढे बेडूक, पाल, सरडे, विंचू, नाकतोड आणि गांडूळ, अशा समाजाने दुर्लक्षित केलेल्या जीवांवर, अभ्यास करण्यास सुरुवात केली.
त्यांची छायाचित्र टिपली. सातार्यातून वाहणार्या कृष्णा नदीतील माशांवर छोटेखानी अभ्यास केला. त्या माध्यमातून 49 प्रजातींची ओळख पटवली. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणादरम्यान, अभ्यासाचा परीघ अधिक विस्तारला. आता अधिक लक्ष हे स्वभाववैशिष्ट्य आणि जीवनसाखळी निरीक्षणाकडे केंद्रित झाले. फुलपाखरांचा अभ्यास करत असतानाच, सागर हे फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतींचेही निरीक्षण करत होते. त्या माध्यमातूनच ते वनस्पतीशास्त्राकडे वळले. ऑर्किड ‘टीड’ नावाचे फुलपाखरू हे केवळ, ऑर्किड म्हणजेच अमरीच्या फुलांवर बागडत असते. या फुलपाखराचे निरीक्षण करत असताना, त्यांची ऑर्किडच्या फुलांसोबत पहिली ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.
सागर ऑर्किडच्या प्रेमात पडले. सोबत कंदिलपुष्प या दुर्मीळ वनस्पतींच्या फुलांचाही शोध घेण्यास सुरुवात केली. ऑर्किड आणि कंदिलपुष्पासारख्या प्रजातींचा शोध घेणे तसे मुश्किलीचे काम. कारण, यामधील बहुतांश प्रजाती या पावसाळी हंगामातच बहरतात. शिवाय, त्यांच्या फुलण्याचा कालावधीदेखील मर्यादित असतो. तसेच कंदिलपुष्पासारख्या वनस्पती तर, अगदी दर्या-खोर्यांमध्ये उगवतात. अशा परिस्थितीत त्यांची नोंद करण्याची योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे आवश्यक असते. या प्रजातींच्या शोधात सागर यांनी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूची जंगल पालथी घातली आहेत. असेच एकदा दुर्मीळ ऑर्किडच्या शोधात त्यांनी, कर्नाटक-गोवाच्या सीमावर्ती भागात बरीच पायपीट केली. मात्र, त्यांना निराशाच मिळाली.
कारण, हवे असणारे ऑर्किड त्यांना काही मिळालेच नाही. त्यामुळे निराश होऊन परत स्वारी सातार्यात परतली. काही दिवसांनी सातार्याच्या जंगलात हिंडताना त्यांना, तेच दुर्मीळ ऑर्किड सापडले. त्यावेळी सातार्याच्या जंगलाचे महत्त्व त्यांना उमगले आणि सातार्यात सखोलपणे निरीक्षणाला सुरुवात केली. सागर यांनी ऑर्किडच्या 70 प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद आणि छायाचित्रण केले असून, महाराष्ट्रात आढळणार्या कंदिलपुष्पाच्या जवळपास सगळ्याच म्हणजेच 21 प्रजातींची नोंद केली आहे.
सातार्यातील जंगलात फिरून सागर यांनी, विविध दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदही घेतल्या आहेत. ‘बेडूकतोंड्या’ या निशाचर पक्ष्याची जिल्ह्यातील पहिलीच नोंद त्यांनी केली. स्थलांतरित पक्ष्यांवरही लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी घेण्याचे काम त्यांनी केले. कास पठारावरील दुर्मीळ ऑर्किडच्या प्रजातींविषयी जनजागृतीदेखील ते करतात. समाजमाध्यमाच्या माध्यमातून, सातारा जिल्ह्यातील जैवविविधता प्रभावीपणे ते जगासमोर मांडतात. ‘वृक्ष संवर्धन समिती’च्या माध्यमातून त्यांनी, कुरणेश्वर येथे 2018 सालापासून चार हजार झाडांची रोपनही केले आहे. त्याची निगाही ते राखत आहेत.
सागर यांच्या घराला राष्ट्रीय स्वयंसेवक सघांची पार्श्वभूमी आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून, कुलकर्णी कुटुंबीयांचा ऋणानुबंध संघ परिवाराशी आहे. सागर स्वतः संघाचे स्वयंसेवक असून, पर्यावरण गतिविधीच्या अनेक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. सातार्यातील जंगलाचा दुर्मीळ ठेवा जगासमोर उलगडणार्या सागर यांना, पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!