पटना : (PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली जाईल", असे ठणकावून सांगितले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
बिहारमधील मधुबनी येथील झांझरपूर येथे जाहीर सभेत भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मौन पाळण्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, " मी हे अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो, ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी तो कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा होईल. त्यांना शिक्षा होईल. दहशतवाद्यांच्या ताब्यातील शेवटचा उरलेला भागही नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा कणा चिरडून टाकेल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कठोर शिक्षा होणार, ज्याचा दहशतवाद्यांनी कधी विचारही केला नसेल!
भारताच्या वाईटावर उठलेल्या जगातील कुप्रवृत्तींना इशारा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी इंग्रजीतून पुढे भाषण सुरु केले. ते म्हणाले, "आज, बिहारच्या मातीतून, मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारताच्या स्पिरीटवर हल्ला करणाऱ्यांना भारत सोडणार नाही. भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, त्यांचा माग घेऊन त्यांना शोधून काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या अंतापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचे स्पिरीट कधीही कमी होणार नाही. दहशतवाद्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या संकल्पात एकजूट आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. कठोर शिक्षा होणार, ज्याचा दहशतवाद्यांनी कधी विचारही केला नसेल. या काळात आपल्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या जनतेचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\