मनसेचे दहशतवादाला पर्यटनाने उत्तर! काश्मीर पर्यटनाबाबत घेतला मोठा निर्णय

    24-Apr-2025
Total Views |
 
Raj Thackeray
 
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक लोकांनी जम्मू काश्मीरची तिकीटे रद्द केली आहेत. अशावेळी मनसेने दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली.
 
संदीप देशपांडे म्हणाले की, "काश्मीरमध्ये अतिशय क्रुरपणे पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सगळ्यांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याला तोंड देणे गरजेचे आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सगळे सुरुळीतपणे सुरु होते. पर्यटन वाढले, लोकांचा रोजगार वाढला, अनेक पर्यटक काश्मीरला जात होते. त्यामुळे अतिरेकी बनवण्याचे कारस्थान करणाऱ्या लोकांची अडचण होऊ लागली. या भीतीमुळे कटकारस्थान करून काश्मीरमध्ये हल्ला करण्यात आला. केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने बदला घेईलच. पण नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी दहशतवाद्यांना उत्तर दिले पाहिजे. तुमच्या दहशतवादाचे उत्तर आमच्या काश्मीरचे पर्यटन आहे, असे त्यांना सांगितले पाहिजे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
मनसेच्या वतीने काश्मीरची सहल!
 
"यासाठी आम्ही काश्मीरची सहल आयोजित करणार आहोत. या सगळ्यात पर्यटन खराब व्हावे हा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावायचा असल्यास देशभरातील सगळ्या लोकांनी काश्मीमध्ये गेले पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन सगळे पदाधिकारी काश्मीरमध्ये जाणार आहोत. आम्ही दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देणार आहोत. काश्मीरमधील चांगली परिस्थिती बिघडू देणार नाही. ज्यांना आमच्याबरोबर काश्मीरला यायचे असल्यास ते संपर्क करू शकतात. काश्मीर भारताचा अंग आहे आणि भारतात कुठेही जाण्याची आम्हाला भीती वाटायला नको, हा संदेश आम्हाला यातून द्यायचा आहे," असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.