श्रीनगर : ( Jaipur resident Neeraj Udhwani martyred in terror attack in Pahalgam ) जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जयपूरचे रहिवासी नीरज उधवानी (३३) यांना गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी अखेरचा निरोप दिला. जयपूरच्या झलाना मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मुखाग्नि दिल्यानंतर उपस्थितांमध्ये दहशतवाद्यांविरोधात रोष उत्पन्न झाला. नीरज यांचे मोठे बंधू किशोर उधवानी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
नीरज यांच्या पश्चात त्यांची पत्नी आयुषी, आई ज्योती आणि कुटुंबातील सदस्य आहेत. पत्नी आयुषी हात जोडून उभी राहिली. तिच्याही अश्रूंचा बांध फुटला होता. “नीरज तु आम्हाला एकटे सोडून का गेलास?”, असे म्हणत तिने टाहो फोडला.
पत्नीसमोरच घातल्या नीरज यांना गोळ्या!
२२ एप्रिल रोजी नीरज त्यांची पत्नी आयुषीसोबत काश्मीरच्या पहलगाममध्ये होते. तेव्हा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. नीरज यांना त्यांच्या पत्नी आयुषीसमोर गोळ्या घालून ठार केले. बुधवारी रात्री ८:१५ वाजता इंडिगोच्या विमानाने त्यांचे पार्थिव जयपूरला आणले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे मॉडेल टाऊनमधील त्यांच्या घरी आणला.
अंत्यसंस्कारापूर्वी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी, उपमुख्यमंत्री दिया कुमारी, विरोधी पक्षनेते टिकाराम जुली, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंह राजेंद्र सिंह, इंदूराव सिंह, राजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी नीरज यांच्या मालवीय नगर येथील निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्र्यांनी नीरजच्या मातोश्री ज्योती यांची भेट घेतली. ज्योती यांना भावना अनावर झाल्या. त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. नीरजच्या पत्नी आयुषी यांनाही हा आघात असह्य झाला होता. त्या बेशुच्छा पडत होत्या.
रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, “हा अत्यंत दुर्दैवी आणि भ्याड दहशतवादी हल्ला आहे. राजस्थान सरकार नीरजच्या कुटुंबासोबत आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जाईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या राजस्थानमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
ते म्हणाले, “दोन दिवसांपासून संपूर्ण देश या भ्याड घटनेबद्दल संतापला आहे. ज्या पद्धतीने ही घटना आहे, त्यावरून कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. उर्वरित पर्यटक सुरक्षितपणे परत येऊ शकतील यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाशी सतत संपर्कात राहून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.''