नवी दिल्ली : (Indus Water Treaty) मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या संरक्षणविषयक बैठकीत १९६० च्या 'सिंधू पाणी करार'स स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा सिंधू करार नेमका काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे? एकंदरीतच या कराराची पार्श्वभूमी समजून घेऊया...
काय आहे सिंधू पाणी करार?
सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० मध्ये झालेला एक करार आहे. हा करार १९ सप्टेंबर १९६० रोजी नऊ वर्षांच्या वाटाघाटींनंतर जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करण्यात आला. तत्कालीन भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांनी सामायिक नद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी या करारावर स्वाक्षरी केली. या करारात, सिंधू नदीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या सहा नद्यांचे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभाजन करण्यात आले. यापैकी सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आले. तर बियास, रावी आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारतासाठी राखीव ठेवण्यात आले.मात्र, भारत पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांचे २०% पाणी रोखू शकतो.तथापि, एकूण परिस्थिती पाहिल्यास, या करारानुसार, भारताला सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त २० टक्के पाणी मिळते. तर पाकिस्तानकडून ८० टक्के पाण्याचा वापर केला जातो. या नद्या पाकिस्तानमध्ये, विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत. या करारादरम्यानच, दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक होते.
या निर्णयाचा काय परिणाम होईल?
सिंधू पाणी करारास स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानला याचा मोठा फटका बसणार आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्या पाकिस्तानसाठी जीवनरेखा आहेत. पाकिस्तानला ८० टक्के पाणी या नद्यांमधून मिळते. पंजाब आणि सिंध प्रांतांची शेती या पाण्यावर अवलंबून आहे. जर हे पाणी बंद झाले तर पाकिस्तानच्या शेतीसह वीज निर्मितीवरही परिणाम होणार आहे. यापैकी एकही नदी पाकिस्तानात उगम पावत नाही. चिनाब आणि झेलम या भारतात उगम पावतात. तर, सिंधू नदीचे उगमस्थान चीनमध्ये असून ती भारतातून वाहत जाऊन पुढे पाकिस्तानात जाते. पाकिस्तानमधील २.६ कोटी एकर जमीनीवर या नद्यांच्या पाण्याने सिंचन केले जाते. पाकिस्तानची ८० टक्के शेतीयोग्य जमीन सिंधू नदी प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे. यातील ९३ टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते, जर हे पाणी बंद झाले तर पाकिस्तानमध्ये शेतीचे नुकसान होईल.पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा २३ टक्के आहे, ६८ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. कराची, लाहोर आणि मुलतान सारखी पाकिस्तानची प्रमुख शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जर भारताने पाणी थांबवले तर पाकिस्तानमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\