मुंबई: ( terrorist attack in Pahalgam is a black day for the country and Dombivli ) काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन मराठी रहिवासी मृत्युमुखी पडले.
यातील संजय लक्ष्मण लेले (५२) राहणार विजयश्री अपार्टमेंट,सुभाष रोड, नवापाडा चौक हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम ह्यांचे सख्खे मेहुणे आहेत व त्यांच्या सोबत इतर डोंबिबलीकर होते ते संजय लेले यांच्या पत्नी सौ. कविता यांचे मावस व आत्ये भाऊ होते. हेमंत जोशी राहणार सावित्री बिल्डिंग, भागशाला मैदान व अतुल मोने राहणार श्रीराम अंचल, सम्राट चौक हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते.
संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले (२०) हे दहशतवाद्यांची गोळी हाताच्या बोटाला लागून किरकोळ जखमी झाले आहे. अतुल मोने (४४) यांची पत्नी अनुष्का व १६ वर्षाची मुलगी रुचा व हेमंत जोशी ( ४३ ) यांची पत्नी मोनिका व १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे ६ जण सुखरुप आहेत परंतु दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ३ डोंबिवलीकर मात्र या भ्याड हल्ल्यात शहिद झाले.
या परिस्थितीत हर्षल लेले ह्या २० वर्षाच्या युवकाने सर्व गांभिर्य लक्षात येताच आपले दुःख गिळून ह्या तीनही कुटुंबीयांना संभाळून अगदी धीराने आलेल्या संकटाचा सामना केला. त्याच्या समोर त्याचे वडील व २ मामा ह्यांना निर्दयी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा, शवगृह, पोस्ट मार्टम या सगळ्या बाबी धीरोधात्त पणे सामोरे जाऊन तो व त्याची आई, मावशी व भावंडे अशी कुटुंबीय काश्मीर मध्ये अनोळखी ठिकाणी संकटाशी सामना करत आहे.
भारत सरकार, भारतीय सैन्यदल, स्थानिक प्रशासकीय अधिकारी,स्थानिक नागरिक ह्यांची मदत होत आहे त्याच बरोबर या यंत्रणेच्या संपर्कात राहून या कुटुंबीयांना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल पासूनच त्वरित मदत करण्यास सुरुवात केली आहे. मदतीच्या पाश्वभूमीवर खासदार शिंदे यांचे स्विय सहाय्यक अभिजित दरेकर हे श्रीनगरला पोहचले आहेत.
राजेश कदम यांच्यासह इतर लेले व मोने कुटुंबीय सुद्धा आज पहाटे श्रीनगरला रवाना झाले असून त्यांच्या सोबत डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांची एक टीम तेथील पुढील मदतीसाठी गेली आहे. व खासदार शिंदे यात स्वतः वैयक्तिक लक्ष ठेऊन आहेत. आमदार रवींद्र चव्हाण,आमदार राजेश मोरे आणि ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे, कल्याण प्रांत गोसावी, डीसीपी झेंडे, कल्याण तहसीलदार, हे देखील ह्या दुर्दैवी कुटुंबीयांच्या मदतीसाठी सतत संपर्कात आहेत.