नवी दिल्ली : काश्मीर खोरं पुन्हा रक्ताने न्हालं, कारण दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला. या अमानुष घटनेनंतर काही तासांत शाहरुख खानने X हँडलवरून एक भावनिक संदेश दिला. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत उभं राहत, शाहरुखने देशवासीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.
त्याने लिहिलं, ''पहलगाममध्ये घडलेली क्रूरता आणि विश्वासघाताने माझं मन भरून आलं आहे. अशा प्रसंगी आपण फक्त देवाकडे प्रार्थना करू शकतो. ज्या कुटुंबांनी आपले आप्त गमावले त्यांच्यासाठी मी मन:पूर्वक संवेदना व्यक्त करतो. आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीने उभं राहूया आणि या क्रूर कृत्याला न्याय मिळवून देऊया.''
सलमान खाननेही आपल्या एक्स हँडलवर संताप व्यक्त केला. त्याने लिहिलं, ''काश्मीर – पृथ्वीवरचं स्वर्ग, आता नरक बनतंय. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जातंय, माझं मन त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. एकही निष्पाप व्यक्ती मारली गेली तर ती संपूर्ण सृष्टीला मारण्यासारखी गोष्ट आहे.''
प्रियंका चोप्रानेही तिच्या इन्स्टाग्रामवरून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
ती म्हणाली, “पाहलगाममध्ये जे घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. लोक तिथे सुट्ट्यांवर, हनिमूनवर, आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करायला गेले होते. फक्त काश्मीरचं सौंदर्य अनुभवत होते. ही अशी शोकांतिका नाही की आपण सहज विसरून जाऊ.
"अनेक निष्पाप जीव एका अशा वादळात अडकले ज्यासाठी त्यांनी काहीही केलं नव्हतं. त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या जवळच्यांवर हल्ला झाला. माझं मन खोलवर व्यथित झालं आहे,'' असं प्रियंकाने शेवटी लिहिलं.
अजय देवगण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, रामचरण, करिना कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ यांसारख्या अनेक कलाकारांनीही ह्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि पीडित कुटुंबीयांसाठी न्यायाची मागणी केली.
मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील पाहलगामजवळच्या बैसरान या प्रसिद्ध माळरानावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत २६ लोकांना ठार मारले. या हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि गुप्तचर विभागातील एक कर्मचारीही मृत्युमुखी पडले.
या हल्ल्याची जबाबदारी 'द रेसिस्टन्स फ्रंट' या लष्कर-ए-तोयबाच्या प्रॉक्सी संघटनेने घेतली आहे.
संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), आणि जम्मू-काश्मीर पोलीसांनी परिसर वेढला आहे. जखमींना दूरच्या माळरानावरून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. स्थानिकांनीही खच्चावरून जखमींना खाली आणण्यात मदत केली.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.