विज्ञानाविषयीच्या भारतीय आणि पाश्चात्य दृष्टिकोनांची तुलना करताना, एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे चक्राकार विकासाची भारतीय कल्पना आणि रेषीय विकासाची पाश्चात्य कल्पना. हा भेद जसा मानवाच्या सृष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतो, तसाच तो मानवजातीच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही प्रभाव टाकतो. स्वाभाविकपणे मानववंशाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना, या दोन परस्परविरोधी प्रतिमानांचे आकलन तर भिन्न आहेच. पण, त्याचबरोबर भविष्यातील वाटचाल शाश्वत प्रकारे होण्यासाठी योग्य मार्ग कोणता? याचे विवेचनही भिन्न आहे. त्यानिमित्ताने आज चक्राकार भारतीय निसर्गदृष्टी आणि भारतीय समाजमनावरील तिचे परिणाम यांचा घेतलेला आढावा...
मानववंशशास्त्राच्या अभ्यासानुसार मानव शेती करायला लागला, तेव्हापासून किमानपक्षी तो आकाशस्थ ग्रहगोलांचे निरीक्षण करतो आहे. ठराविक कालाने होणारे ग्रह-नक्षत्रांच्या उदयास्त, समयांतील बदल आणि तशाच आधारावर होणारे पृथ्वीवरील ऋतूंमधील बदल यांचा कुठेतरी समन्वय लावण्याचा प्रयत्न, या इतिहासपूर्व काळात झाला असेल. संस्कृतीच्या उगमाबरोबर कालमापनाची केवळ दिवस-रात्र, भरती-ओहोटी, ऋतू-संवत्सरे अशी ढोबळ मोजणी पुरेशी न राहता, अधिकाधिक सूक्ष्म आणि अचूक मोजणी आवश्यक ठरली असेल. याच काळात, स्थिर नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर ग्रहांची गती मोजण्यात आली.
पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याची दिवस आणि रात्रीची गती, या सर्वांपासून वेगळी काढली गेली. भारतामध्ये वेदकाळात ज्योतिष आणि गणिताच्या प्रगतीची थोडक्यात माहिती, आपण मागे पाहिली आहे. या खगोलीय वस्तूंच्या चक्राकार गतीबरोबरच पृथ्वीवर दिसणार्या ऋतूंच्या चक्राची गती स्वाभाविकपणे जोडली जाऊन, विशेषतः चंद्र-सूर्याच्या भ्रमणकाळाबरोबर एका वर्षात 12 मास आणि सहा ऋतूंचे चक्र बसवण्यात आले. ऋतूंच्या विशिष्ट हवामानानुसार, त्या काळात करण्याच्या शेतकी किंवा अन्य क्षेत्रातील विशिष्ट कामांची रचना बसवण्यात आली. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की, या प्रत्येक ऋतूत होणार्या कामांभोवती प्रासंगिक उत्सवांची गुंफण करून, इथे प्रत्येक काम हा एक आनंदसोहळा तर केलाच; पण त्यास एक आध्यात्मिक अधिष्ठानही दिले.
जसजसा मानवी समाज प्रगत होत गेला, तशी त्याला निसर्गात चालू असलेली अन्यान्य पातळीवरील सूक्ष्म चक्रे लक्षात येऊ लागली. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्जन्यचक्र. विशेषतः भारतात वर्षाच्या काही ठराविक महिन्यातच पाऊस पडतो. या काळात अनेक छोट्या नद्या वाहायला लागून, त्यांच्या खोर्यात शेतीस पोषक परिस्थिती निर्माण करतात. याच काळात नैसर्गिकरित्याही वनस्पती सृष्टीची जोमाने वाढ होऊन, संपूर्ण निसर्गच एक प्रकारे नवा जन्म घेतो. पर्जन्यचक्राचे शेतीसाठी आणि त्यायोगे संपूर्ण वर्षभर पुरेसे अन्नधान्य मिळण्यासाठी असलेले महत्त्व अनन्यसाधारण आहे.
वातावरणातील विविध वायूंचे आणि त्यांच्या रासायनिक गुणधर्मांचे ज्ञान जसे मानवास झाले आहे, तशी वातावरणातील अन्य चक्रेही मानवाने समजून घेतली आहेत. श्वसन आणि प्रकाशसंश्लेषण या दोन प्रक्रियांच्या आधारे चालणारे प्राणवायूचे चक्र यातील सर्वांत मुख्य आहे. सर्व जीवनाचा आधार असलेला प्राणवायू, एका चक्रीय पद्धतीत सर्व प्राण्यांद्वारे वापरला जातो आणि नंतर सर्व वनस्पती तो पुन्हा निर्माण करतात. याच प्रकारचे दुसरे चक्र म्हणजे, नत्रवायूचे चक्र जे आपल्या वाढीसाठी आवश्यक प्रथिने, त्यातून निर्माण होणारी अमिनो आम्ले आणि या प्रक्रियेच्या केंद्रात असलेले आणि सजीव सृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे डीएनए रेणू या सर्वांची निर्मिती करते.
निसर्गातील विविध चक्रांचा अभ्यास करता करता, जीवसृष्टीतीलही चक्रे आपल्या लक्षात येऊ लागतात. पतंग किंवा फुलपाखरांचे जीवनचक्र आणि त्यातील विविध अवस्था आपण पाहतो. अधिक खोलवर पाहता, सर्वच प्राण्यांमध्ये काही ना काही अवस्थांतरण होत असल्याचे आपल्या लक्षात येते. इतकेच नाही, तर कित्येक सजीवांची चक्रे एकमेकांत गुंफलेली असतात. उदाहरणार्थ, मधमाशा आणि फुलांच्या वनस्पती यांचे एक परस्परावलंबी चक्र असते, ज्यात दोन्ही घटकांनी आपापले काम केले, तरच दोन्हींचे पोषण व्यवस्थितरित्या चालू राहते.
याच चक्रांचा एक मोठा आविष्कार म्हणजे, संपूर्ण अन्नसाखळीचे चक्र. ‘जीवोजीवस्यजीवनम्’ या तत्त्वानुसार वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, मृतभक्षी प्राणी आणि सूक्ष्मजीव यांंचे एक प्रचंड चक्र आणि त्यातील अनेक उपचक्रे अन्न निर्माण करत असतात. अन्नाचे भक्षण करतात आणि पुढील पातळीवर स्वतःच भक्ष्य बनून, दुसर्या प्राण्यास अन्नाचा पुरवठाही करतात. या चक्रात प्रत्येक पातळीवरील सजीव, हा पुढच्या पातळीवरच्या सजीवाचे भक्ष्य आहे. इतकेच नव्हे, तर ही सर्व जीवसृष्टीतील चक्रे परस्परांत गुंतलेली असून, अन्नसाखळीच्या चक्राचे फिरणे अव्याहत चालू राहण्यासाठी, विविध वायूंची आणि पर्जन्याचे चक्र चालत राहणे आवश्यक आहे.
अन्नसाखळी चक्राच्या आकलनातील एक थोडा फरक इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. याच चक्राला ‘जैविक पिरामिड’ या स्वरूपातही काही वेळा पाहिले जाते. चक्रीय संकल्पना आणि पिरामिड संकल्पना यातील मुख्य फरक म्हणजे, विविध घटकांमधील उच्चनीचता. या प्रतिमानात खालच्या पातळीचे (कमी उत्क्रांत) सजीव, हे मोठ्या संख्येने अन्ननिर्मिती करतात आणि वरच्या पातळीचे भक्षक, हे या अन्नाचे उपभोक्ते असतात. अशा प्रकारचा उपभोग, हा पिरामिडच्या वरच्या पातळीवरील प्राण्यांचा नैसर्गिक अधिकार असल्याचे या प्रतिमानात मानले जाते. योग्य प्रमाणात शिकार केल्याने, ते खालच्या पातळीवरील प्राणी आणि वनस्पती यांच्या संख्येत समतोल राखण्यास मदतच करत असतात. एखाद्या जंगलात जरी या पिरामिडच्या शीर्षस्थानी वाघसिंह असल्याचे मान्य केले, तरी संपूर्ण पृथ्वीचा विचार करता हे स्थान केवळ मानवाचेच आहे आणि ते त्याने त्याच्या बुद्धीच्या जोरावर प्राप्त केले आहे, असे पिरामिड प्रतिमानात मानले जाते.
मानवाचा निसर्गाशी संबंध या प्रतिमानात कशा प्रकारे पाहिला जातो, हे उघड आहेच. पण, दुर्दैवाने हेच प्रतिमान युरोपीय समाजांनी त्यांच्या वर्णश्रेष्ठतेच्या कल्पनेपायी, स्वतः आणि अन्य वांशिक समाज यांच्या संबंधांसाठीसुद्धा वापरलेले आहे. याच पिरामिड प्रतिमानाचा भाग म्हणून, त्याच्या विविध पातळ्यांमध्ये सततचा संघर्ष कल्पिलेला आहे. वर म्हटल्याप्रमाणे मधमाशी आणि फुलाचा साहचर्याचा क्रमविकास, पिरामिड तत्त्वाच्या काहीसा विरुद्ध आहे. पाश्चात्य संकल्पना अशा सर्व अंतर्विरोधांचे निरसन करतेच असे नाही. परंतु, पिरामिड संकल्पनेवरून आलेल्या त्यांच्या सामाजिक प्रतिमानात, हे संघर्षाचे तत्त्व अंतर्भूत आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाची झेपही, या जैविकप्रतिमानाचे आरोपण मानवी जीवनावर करण्याच्या दिशेनेच आहे.
परंतु, मुळातील प्रतिमान हे चक्रीयस्वरूपाचे असल्याने, हिंदू संकल्पना निसर्गात आढळणार्या जैविक चक्राला जन्म-मृत्यूच्या चक्राशी जोडते. त्यामुळे येथे ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्ममृतस्य च’ असे चक्राकार प्रतिमान जन्म घेते. याबरोबरच कर्मफलाची संकल्पना जोडली जाऊन, जीवाचे एक अव्याहत चक्र कल्पिलेले आहे. सततचा जन्म आणि सततचा मृत्यू असल्याने आणि ईश्वर संकल्पना ही निराकार परब्रह्माची असल्याने, जीवनाचा उद्देश संसार चक्रातून मुक्ती हा होतो. स्वाभाविकपणे हिंदू मनाला, पृथ्वीवरील सुखोपभोगांच्या चक्रीयतेची कल्पना सहजपणे येते आणि परलोक हा मुक्तीबरोबर चिरशांतीचे स्थान असतो. यामुळेच भारतीय संकल्पनेतील चतुष्ट्य पुरुषार्थात, अर्थ आणि काम हे धर्माच्या आधारे करावयाचे असतात आणि धर्माचे संकल्पन हे अनेकदा धर्मचक्र अशा स्वरूपात केले जाते.
पाश्चात्य रेषीय प्रतिमानातील, वाढत्या श्रेणीतील सुखोपभोगांची कल्पना आणि निवाड्याच्या दिवसानंतर श्रद्धाळूंना प्राप्त होणार्या स्वर्गसुखाच्या कल्पना पाहता, या दोन प्रतिमानांमधील ऐहिक तसेच पारलौकिक सुखाच्या आणि आदर्श स्थितीच्या कल्पनांमधील महदंतर लक्षणीय आहे. हिंदू चक्रीय प्रतिमानामुळे, भारतीयांना स्वाभाविकपणे सुख आणि दुःख यांचे परस्पर साहचर्य मान्य होते. कोणत्यातरी मार्गे आपणास अमर्याद सुख लाभेल, अशी कल्पना भारतीय समाज कधी करत नाही आणि वाट्यास आलेले दुःखही चक्रीय गतीने दूर होईल, हे तो जाणून असतो. यामुळे ऐहिक जीवन जगताना भारतीय मन, हे सुखापेक्षा संतोष आणि समाधान या संकल्पनांना अधिक महत्त्व देते. या दोन्ही शब्दांच्या आधी येणारा सम हा प्रत्यय, हिंदूदृष्टी दाखवून देणारा आहे.
सम म्हणजे कशाचेही आधिक्य नाही आणि कशाचा अभाव नाही अशी स्थिती. त्यामुळे हिंदू मन हे सुखाचा अतिरेक मागत नाही आणि दुःखाच्या कडेलोटाला जात नाही. सामाजिक सुखाचा आणि स्थैर्याचा विचार करताना, हा समत्वभावाचा विचार महत्त्वाचा आहे.
विज्ञान म्हणजे नेमके काय याची कोणतीही जरी संकल्पना मांडली, तरी आजचे युग विज्ञानाचे आहे हे नाकारता येत नाही. काळाचे चक्र उलटही फिरवता येत नाही. त्यामुळे मानवी समाजाने इथून पुढे जाताना, मानवी समाज आणि परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंधांचा पुनर्विचार करण्याची आज वेळ आली आहे. प्रचलित असे रेषीय पाश्चात्य संकल्पना आणि सनातन हिंदू चक्रीय संकल्पना या दोन्हींचा सम्यक विचार करून, येणार्या काळासाठी एक शाश्वत असे प्रतिमान मांडले जाण्याची आजची आवश्यकता आहे. प्राचीन भारतीय चिंतनाचा अर्थ कालसुसंगतरित्या मांडून, निसर्गाशी एकात्म असे शाश्वत विकासाचे नवे प्रतिमान मांडणे हे केवळ वसाहतवादाच्या जोखडातून स्वतःला मुक्त करण्यासाठी नाही, तर ‘स्व’च्या पायावर उभे राहून संपूर्ण जगाला एक नवी दिशा दाखवण्यासाठी आहे.
- हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)