रायपूर : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे वक्तव्य समाजात द्वेषभावना पसरवणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शहर कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, ही तक्रार रायपूरस्थित पंडित नीलकंठ त्रिपाठी यांनी केली आहे. ते राष्ट्रीय ब्राह्मण महासंघ (भारत) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छत्तीसगड प्रभारी आहेत.
"अनुराग कश्यप यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ब्राह्मण समाजाबद्दल जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य समाजाच्या एकतेला बाधा आणणारे आहे आणि ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे आहे," असे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १९६ (धर्म, जात, भाषा, जन्मस्थान इत्यादीवरून समाजात तेढ निर्माण करणे) आणि ३०२ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने बोलणे/वक्तव्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मंगळवारी अनुराग कश्यप यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. "मी खरंच माफी मागतो. मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोललो. या विषयी बोलताना मी मर्यादा ओलांडली आणि अपमानास्पद भाषा वापरली, याबद्दल मी खेद व्यक्त करतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.