॥श्री देवी उपनिषद॥
भाग तिसरा
देवी उपनिषदामध्ये जगदंबेच्या बीजमंत्राचा ऊहापोह करण्यात आला आहे. या मंत्राच्या शक्तीच्या आणि उपासनेच्या माध्यमातून येणार्या जगदंबेच्या कृपेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. देवी उपनिषददेखील असेच स्तोत्र. त्याचा घेतलेला हा आढावा...
वियदीकारसंयुक्तं वीतिहोत्रसमन्वितम्।
अर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम्॥18॥
वियत (आकाश)-त्याचे अक्षर ’ह’ आणि ’ई’काराने युक्त वीतिहोत्र (अग्नि)चे अक्षर ’र’सहित अर्चचन्द्र याने अलंकृत असे जे देवीचे बीज ‘ह्रीं’ ते सर्व मनोरथ सिद्धीस नेणारे असे आहे. ‘ह्रीं’ हा बीजमंत्र एकाक्षरी असून, त्याचे विग्रह निरूपण पुढीलप्रमाणे आहे. ह्-हे सगुण ब्रह्माचे द्योतक आहे, जे सृष्टीचा प्रारंभ आहे. र्-हे सौरऊर्जा किंवा तेज सूचित करते, म्हणजे क्रियेची प्रेरणा देणारी शक्ती. ई-ही चैतन्यशक्ती, म्हणजे परमात्म्याची अंतर्यामी रूपातील शक्ती. (अनुनासिक बिंदू) - हे पूर्णता आणि ब्रह्म सूचित करते.
हे सर्व मिळून ‘ह्रीं’ हा बीजमंत्र तयार होतो. याला ‘माया बीज’ असेही म्हटले जाते. ‘ह्रीं’ हे मायाशक्तीचे बीज आहे. मायाशक्ती म्हणजे सृष्टी, स्थिती आणि लय करण्याची परमशक्ती. देवीला महामाया म्हटले जाते; कारण तीच सृष्टीचे भान निर्माण करते आणि मुक्तीचा मार्गही दाखवते. ‘ह्रीं’ हा मंत्र विशेषतः महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या त्रिदेवत्वाच्या रूपांमध्ये उपासला जातो.
एवमेकाक्षरं मन्त्रं यतयः शुद्धचेतसः।
ध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः॥19॥
ज्यांचे चित्त शुद्ध, परम आनंदपूर्ण झालेले आहे, जे ज्ञानाचे साक्षात सागर आहेत, असे यति ‘ह्रीं’ या एकाक्षर ब्रह्माचे ध्यान करतात. ॐकाराप्रमाणेच हा देवीचा प्रणव मंत्रही, त्याच्यासारखाच व्यापक अर्थाने घेतला जातो.
‘ह्रीं’ मंत्र जपल्याने चित्तशुद्धी, बुद्धिचातुर्य, आध्यात्मिक तेज आणि अंतःकरणाची उन्नती होते. हा मंत्र मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांवर प्रभाव टाकून,उपासकाला आध्यात्मिक उन्नतीच्या वाटेवर नेते. कुण्डलिनी शक्ती जागृतीत ‘ह्रीं’ मंत्र उपयोगी आहे.
वाङ्माया ब्रह्मसूतस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम्।
सूर्योऽवामश्रोत्रबिन्दुः संयुक्तष्टातृतीयकः।
नारायणेन संमिश्रो वायुश्चाधरयुक् ततः।
विच्चे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः॥20॥
वाणी (ऐं), माया (ह्रीं), ब्रह्मसू-काम (क्लीं), यापुढे कान्यासहित सहावे व्यंजन (म्हणजे ’चा’), अवाम (दक्षिण) कर्ण, ’उ’ अनुस्वारयुक्त सूर्यसहित (म्हणजे ’मुं’), नारायणांतील ’आ’ने युक्त ‘ट वर्गा’तील तिसरे अक्षर ( म्हणजे ’डा’ ), अधर (ऐ)ने युक्त वायु, (म्हणजे ’यै’) आणि या सर्वांनंतर विच्चै असा एकूण नऊ वर्णांचा मंत्र, ‘ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै’ उपासकांना आनंद व ब्रह्मसायुज्य मिळवून देणारा आहे. ‘ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै’ या मंत्राचा अर्थ ऐं (ऐं बीज) : हा सरस्वतीचे बीजमंत्र आहे. ह्रीं (ह्रीं बीज) : हा मायाशक्तीचे बीजमंत्र आहे. क्लीं (क्लीं बीज) : हे कामबीज म्हणून ओळखले जाते. चामुंडायै (चामुंडा+आयै) : ‘चामुंडा’ म्हणजे चंड आणि मुंड या असुरांचा वध करणारी देवी. ‘आयै’ ही संस्कृत व्याकरणात चतुर्थी विभक्ती आहे म्हणजे, चामुंडेला-चामुंडा देवीस. विच्चै (तळलहलहश) : हे एक तांत्रिक ‘कवच बीज’ आहे.
हे विद्या, माया आणि इच्छा शक्तीच्या स्वरूपात असणार्या चामुंडा देवी! चंड-मुंडासारख्या दुष्टांचा संहार करणार्या माते, तुझ्या कृपाशक्तीने मला ज्ञान, आकर्षण, शक्ती व संरक्षण लाभो, असा मंत्राचा भावार्थ आहे.
हृत्पुण्डरीकमध्यस्थां प्रातःसूर्यसमप्रभाम्।
पाशाङ्कुशधरां सौम्यां वरदाभयहस्तकाम्।
त्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुघां भजे॥21॥
पाश आणि अंकुश हे साधकाच्या इंद्रियांचे संयमन दर्शवतात. वरद आणि अभयमुद्रा, या देवीच्या पालक स्वरूपाची आठवण करून देतात. त्रिनेत्री हे त्रिकालदर्शिता आणि त्रिगुण नियंत्रण याचे प्रतीक. रक्तवसना म्हणजे क्रियाशीलता, शक्ती आणि रजोगुणाचे प्रतीक. कामदुघा म्हणजे, भक्तासाठी ईश्वरी कृपेशी सम असणारी, सर्व इच्छा पूर्ण करणारी शक्ती.
जी देवी भक्ताच्या हृदयकमळात निवास करते, जी प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, जी हातात पाश व अंकुश धारण करते आणि सौम्य, करुणामय स्वरूपात दिसते; जिच्या दोन हातांमधून वरदान आणि अभय प्राप्त होते, जी तीन डोळे असलेली आणि रक्तवस्त्र परिधान केलेली आहे, अशा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणार्या देवी भगवतीची मी भक्तिपूर्वक उपासना करतो.
नमामि त्वाम् महादेवीं महाभयविनाशिनीम्।
महादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरूपिणीम्॥22॥
हे महादेवी! तूच सर्व जगताची जननी आहेस; सर्वात भयंकर भयांचे नाश करणारी आहेस; जीवनातील कठीण प्रसंग शांत करणारी आहेस आणि अंतःकरणात अपार करुणा असलेली तूच आहेस. अशा तुझ्या चरणी मी नम्रतेने नमन करतो.
यस्याः स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया।
यस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता।
यस्या लक्ष्यम् नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या। यस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा।
एकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका।
एकैव विश्वरूपिणी तस्मादुच्यते नैका।
अत एवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति॥23॥
ब्रह्मादिकांना जिच्या स्वरूपाचा पार लागत नसल्याने जिला ’अज्ञेया’ म्हणतात, जिचा अंत न कळल्यामुळे जिला ’अनंता’ म्हणतात, जिचे स्वरूप दृगोचर होत नसल्यामुळे, जिला ’अलक्ष्या’ असे संबोधिले जाते, जिच्या जन्माचे रहस्य न कळल्यामुळे जिला ’अजा’ म्हणतात, सर्वत्र जिचे अस्तित्व असते म्हणून ’एका’ आणि संपूर्ण विश्वरूपाने सजल्यामुळे जिला ’नैका’ ही म्हणतात. अशी ही देवी अज्ञेया, अनंता, अजा, एका आणि नैका म्हटली जाते.
ती परात्पर शक्ती आहे. ज्ञानातीत, जन्मातीत, सीमातीत, अद्वितीय असूनही, सर्वत्र व्यापलेली. तीच एक असूनही सर्व काही आहे.
या श्लोकात देवीचे अद्वैत व अद्भुत स्वरूप सांगितले आहे, अज्ञेया-बुद्धीच्या पलीकडची, अनन्ता-मर्यादा नसलेली, अलक्ष्या-इंद्रियांनी जाणता न येणारी, अजा-अजन्मा आणि शाश्वत, एका-एकमेव तत्त्वरूप, नैका-सर्व रूपांमध्ये कार्यरत.
मन्त्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी।
ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी।
यस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता॥24॥
भगवती देवीच सर्व मंत्रांची जननी आहे, शब्दरूप ज्ञानस्वरूप आहे, ती ज्ञानाच्या पलीकडील शुद्ध चैतन्य आहे आणि निर्विकार शून्याच्या अवस्थेची साक्षी आहे. जिला काहीही परमार्थतः उच्च नाही, तीच ही दुर्गा म्हणून ओळखली जाते.
तिला प्रदान केलेल्या विशेषणाचे स्वरूप जाणून घेऊया. मातृका-51 अक्षरे/बीजमंत्रांचे स्रोत, ज्ञानरूपिणी-विवेक आणि प्रकाश, चिन्मयातीता-निर्विकल्प चैतन्यस्वरूप, शून्यसाक्षिणी-ध्यानातील निर्विचार अवस्थेची अनुभूती, परात्पर दुर्गा-निर्गुण ब्रह्माचे स्त्रीतत्त्व म्हणून प्रतिपादन आहे.
तां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम्।
नमामि भवभीतोहं संसारार्णवतारिणीम्॥25॥
मी त्या दुर्गा देवीला वंदन करतो, जी अत्यंत दुर्गम (दुर्लभ, पण अनंत शक्तीची मूर्ती) आहे, जी अधर्म आणि दुराचाराचा नाश करते.
मी या भवसागराच्या भीतीने ग्रासलेला आहे आणि तीच संसाररूपी महासागरातून, तारणारी आहे, म्हणून मी तिला नम्रतेने शरण जातो.
इदमथर्वशीर्षं योऽधीते पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति।
इदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति।
शतलक्षं प्रजप्त्वापि सोऽर्चासिद्धिं च विन्दति।
शतमष्टोत्तरं चास्याः पुरश्चर्याविधिः स्मृतः॥
दशवारं पठेद्यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते।
महादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः॥26॥
या अथर्वशीर्षाचा जो अभ्यास करेल, त्याला पाच अथर्वशीर्षाच्या जपाचे फळ प्राप्त होते. याचा अर्थ न जाणता, लाखो वेळा जप केल्यानेही काहीच साध्य होत नाही. अष्टोत्तर जप, याचा पुरश्चरण विधी आहे (पुरश्चरणासाठी 108 वेळा जप करावा). दहा वेळा पाठ केल्याने, महादेवीच्या प्रसादाप्रीत्यर्थ अती दुस्तर संकटांचे निवारण तसेच पापापासून मुक्ती मिळते. पुढच्या श्लोकात फलश्रुति सांगितलेली आहे.
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति।
सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति।
सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति।
निशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति।
नूतनायाम् प्रतिमायां जप्त्वा देवतासांन्निध्यं भवति।
प्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति।
भौमाश्विन्यां महादेवी संनिधौ जप्त्वा महामृत्युं तरति स महामृत्युं तरति।
य एवं वेद। इत्युपनिषत्॥27॥
पहाटे पठण करणार्याच्या रात्री घडलेल्या पापांचा तसेच संध्याकाळी पठण करणार्याच्या दिवसभरांत घडलेल्या पापांचा नाश होतो. मध्यरात्रीच्या अध्ययनाने वाचासिद्धी प्राप्त होते. समोर प्रतिमा ठेऊन जप केल्याने, देवीचे सान्निध्य लाभते. ’भौमाश्विनी’ योग असताना जप केल्याने, साधक महामृत्युही तरून जातो. अशी ही अविद्येचा नाश करणारी ब्रह्मविद्या आहे.
सुजीत भोगले
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
॥इति श्रीदेव्युपनिषत्समाप्ता॥
(क्रमशः)
9370043901