पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र
तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी; रुईया महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारांचा जागर
23-Apr-2025
Total Views |
मुंबई (Pandit Deendayal Upadhyay Antyodaya):“गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले.
एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच दिवशी ६० वर्षांनी दि. २२ एप्रिल ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘लोढा फाऊंडेशन’, ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव समिती’ महाराष्ट्र आणि ‘दीनदयाल रिसर्च सेंटर’ यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. त्यानंतरच्या सत्राला संबोधित करताना तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी बोलत होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती. पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह, अतुल जैन, एच. के. जैन व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’च्या पोस्टल कव्हरचे अनावरण करण्यात आले.
रवींद्र नारायण रवी म्हणाले की, “द्रष्टे व्यक्तिमत्त्व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत पाऊल ठेवल्यानंतर अनेक स्मृती जाग्या झाल्या. त्यांचे ‘एकात्म मानवदर्शन’ सर्वस्पर्शी आहे. हा राष्ट्राचा बीजमंत्र आहे. स्वातंत्र्यानंतर आपण गणराज्याची स्थापन केली, पण दुर्दैवाने पहिली ६० वर्षे अशा मार्गावर वाटचाल झाली, की देश अस्थिर होत गेला. गणराज्याला भारतीय संस्कृतीनुसार न चालवता, पाश्चिमात्य विचारांवर चालवले गेल्याचा हा परिणाम होता. भारताचा ‘नेशन’ असा उल्लेख मनाला पटत नाही. कारण ‘नेशन’ हे राष्ट्राशी समानार्थी नाही. राष्ट्र म्हणजे आचार-विचार, संस्कृती आणि परंपरेचे अविभाज्य अंग आहे. राष्ट्र म्हणजे एक कुटुंब आहे. प्रकृतीच्या प्रत्येक तत्त्वात देवत्वाचे अंग असते. त्यामुळे घरी आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला आपण ‘अतिथी देवो भव’ म्हणावे,” असे ते म्हणाले.
“धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा गळा घोटण्यात आला. स्वातंत्र्यानंतर सरकारी धोरणे युरोपीय पद्धतीप्रमाणे बनवण्यात आली. त्यामुळे भारत सर्वच क्षेत्रांत कायम मागे राहिला. २०१४ आधी जग भारताकडे वेगळ्या नजरेने पाहात होते. अर्थव्यवस्था इतकी कमजोर होती की, हीन वागणूक मिळत होती. पण आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. एक परिपूर्ण राष्ट्र म्हणून भारताचा जगात लौकिक आहे. देशाच्या शीर्ष नेतृत्वात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवदर्शन’चे प्रतिबिंब उमटते,” असे उद्गारही त्यांनी काढले. तसेच “एकात्म मानवदर्शन’चा अवलंब स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि सर्वच क्षेत्रांत व्हावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी याच ऐतिहासिक स्थळावरून ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. आज संपूर्ण जग त्या विचारांवर संशोधन करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडितजींच्या विचारांवर चालत ‘अंत्योदय’चे काम करीत आहेत. त्यामुळे भारताला विकसित करायचे असेल, तर पंडितजींचे विचार अंगीकारावे लागतील,” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले.
पंडितजी विकसित भारताचे दिशादर्शक : किरेन रिजिजू
प्राचीन काळापासून आमच्याकडे जे ज्ञान आहे, ते जगातील कोणत्याही देशाकडे नाही. चीन आणि युरोपीय देशांनी आपले तत्त्वज्ञान घेतले. आज कोणत्याही युरोपीय देशातील नागरिकांशी भारतीयांची स्पर्धा लावा. आम्ही त्यांना परास्त करू,’ असा विश्वाास संसदीय कार्य आणि अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, “आज आम्ही कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. मग देश गरीब कसा राहिला? १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, पण श्रीमंती मिळाली नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे विचार आणि आचरण इंग्रजांच्या मार्गावर असल्याने भारताला प्रगती साधता आली नाही. ही स्थिती ६० वर्षे कायम होती.”
“२०१४ नंतर ‘लक्ष्य’ दिसू लागले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण (पान ६ वर)(पान १ वरुन)‘विकसनशील देश’ म्हणून हिणवून घेत आहोत. पण मोदींच्या नेतृत्वात भारताला जेव्हा १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देश विकसित होईल, हे स्वप्न मोदी यांनी पाहिले आहे. मोदी आल्यापासून अगदी शेवटच्या गावात पाणी, वीज आणि विकास पोहोचला. शेवटच्या घटकाला सोबत घेऊन मोदींनी विकासाचा मार्ग अवलंबला,” असे रिजिजू म्हणाले.
“एकात्म मानवदर्शन’मधील विचार आचरणात आणून मोदींनी भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला आणले. भारतीय संस्कृती आणि भारतीय विचारानेच आपण विश्वगुरू बनणार आहोत. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ विकसित भारताच्या वाटचालीत दिशादर्शकाचे काम करणारे आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.