ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता घराच्या बदल्यात थेट मिळणार घर
रहिवाशांच्या शिष्टमंडळाने घेतली ‘म्हाडा’उपाध्यक्षांची भेट
23-Apr-2025
Total Views | 7
मुंबई,(MHADA,Motilal Nagar)“मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांना घराच्या बदल्यात थेट घर मिळणार आहे. त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता त्यांचे थेट पुनर्वसन करण्यात येणार आहे.
गोरेगावमधील तब्बल १४३ एकर (५ लाख, ७६ हजार, ९00 चौ.मी.) इतक्या भव्य जमिनीवर वसलेल्या मोतीलाल नगरचा पुनर्विकास ‘म्हाडा’च्या अंतर्गत खासगी विकासकामार्फत करण्यात येणार आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘अदानी समूहा’ने निविदा प्रक्रियेत बाजी मारली आहे.
अशा वेळी गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या रहिवाशांचेही थेट पुनर्वसन केले जाईल. धारावीप्रमाणेच ‘की-टू-की’ म्हणजे कुणालाही ट्रान्झिट कॅम्पमध्ये न पाठवता थेट पुनर्वसन करण्यात येईल,” असे आश्वासन म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य अधिकारी संजीव जयस्वाल यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळाला दिले. “रहिवाशांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. रहिवाशांच्या दोन हजार चौ. फूट घराच्या मागणीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवणार,” असेही जयस्वाल यांनी सांगितल्याची माहिती रहिवाश्यांच्या शिष्टमंडळाने दिली.
“मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, ‘म्हाडा’उपाध्यक्षांना जबाबदार धरण्यात आले आहे. हा पुनर्विकास करताना कायदा आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल,” असे संजीव जयस्वाल म्हणाले. “मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे थेट पुनर्वसन केले जाणार आहे. या विकासात रहिवाशांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, यासाठी आम्ही दक्ष आहोत,” असे आश्वासन संजीव जयस्वाल यांनी दिले.
या शिष्टमंडळात युवराज मोहिते यांच्यासह किरण निरभवणे, तरसेमसिंग सोहल, लक्ष्मी शिंदे, मिलिंद अडागळे, गौतम कांबळे, अलीम खान, अमीत काकडे आदी रहिवाशांचा समावेश होता.
काय म्हणाले जयस्वाल
पुनर्वसन प्रकल्प प्रक्रियेसाठी मोतीलाल नगरमध्ये होणारे सर्वेक्षण आणि इतर सर्व बाबींची रहिवाशांना आधी माहिती दिली जाईल.
रहिवाशांची दोन हजार चौ. फुटांची मागणी, कॉर्पस फंड, पार्किंग व इतर मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.