आयुष्यात खडतर संघर्ष करूनसुद्धा न डगमगता, समाजसेवेचा ध्यास घेऊन जगणार्या ज्योत्स्ना लोकरे यांच्याविषयी...
संघर्षाच्या ज्वालांमधून तावून सुलाखून निघालेली अनेक माणसं, आपल्या अवतीभोवती वावरत असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाची जीवन कहाणी म्हणजे, अनुभूतीचा साक्षात्कार असतो. परंतु, ही झळ सोसून पुन्हा एकदा नव्या दमाने, दुसर्यांसाठी उभी राहणारी माणसं निराळीच असतात. कालांतराने त्यांची वेदनाच, संवेदना होते आणि ते स्वतःपुरते न राहता, या विशाल समाजाचे आदर्शबिंदू होतात. ज्योत्स्ना लोकरे हे नाव, अशाच काही निवडक आदर्शांपैकी एक.
वयाच्या 16व्या वर्षी ज्योत्स्ना बोहल्यावर चढल्या. कमी वयातच मोठ्या माणसासारखी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. दहा बाय दहाच्या खोलीत सुरू झालेल्या त्यांच्या संसाराने, त्यांना अनेक धडे दिले. घरामध्ये 12 माणसांचा संसार सांभाळत, ज्योत्स्ना कळत नकळत घडत होत्या. सुरुवातीला वाचनालयात काम करताना, केवळ 700 रुपये पगारावर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा रेटला. अशातच आपल्या पतीच्या आजारपणाचा आणि क्रमाने संघर्षाचा काळ, त्यांच्या आयुष्यात सुरू झाला. आपले आयुष्य ही आपली जबाबदारी आहे, हा स्वाभिमानी बाणा त्यांनी कायम जपला. म्हणूनच सासरच्या किंवा माहेरच्या माणसांकडून कुठलीही मदत न स्वीकारता, त्यांनी मेहनत करत सगळ्या संकटांना तोंड दिले. दारोदारी जाऊन वस्तू विकण्याचे काम, ज्योत्स्ना यांनी केले.
दरम्यानच्या काळात त्यांनासुद्धा, आजारपणाचा सामना करावा लागला. आपल्या या संघर्षकाळावर भाष्य करताना त्या म्हणतात की, “या काळामध्ये माझ्या आईने मला दिलेली शिकवण मी सतत आठवत राहिले. कुठल्याही परिस्थितीमध्ये न खचता, न डगमगता, समोर येईल त्या गोष्टीला सामोरे जायचे.”
‘कार्यमग्न हे जीवन व्हावे,’ हा संस्कार आत्मसात करत, ज्योत्स्ना काम करत राहिल्या. काम करताना, समाजात वावरताना ज्योत्स्ना यांना अनेक वाईट अनुभवांचासुद्धा सामना करावा लागला. परंतु, ज्योत्स्ना यांची पाऊले थकली नाहीत, त्या चालतच राहिल्या. त्यांनी आपल्या मुलींना चांगले शिक्षण दिले. त्यांचे लग्नकार्यसुद्धा थाटात पार पाडले. जीवनाच्या एका अशा टप्प्यावर त्या पोहोचल्या, जेव्हा त्यांनी आपल्या भूतकाळाकडे निरखून पाहिले. अनुभवांचे संचित त्यांच्या गाठीशी होते. अशावेळी त्यांनी ठरवले की, आपण ज्या निखार्यावरून चालत आलो, त्या निखार्यांचा सामना इतरांनी करू नये म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. भौतिक जीवनाच्या जबाबदार्या आणि इप्सित कर्तव्य पार पाडल्यानंतर, समाजसेवा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा आणि कार्याचा त्यांनी ध्यास घेतला.
2014 साली बोरिवलीचे तत्कालीन आ. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्या सहकार्याने, त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. बोरिवली येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत, जोत्स्ना यांनी आपल्या जीवनाला नवीन वळण दिले. यानंतर त्यांनी सामाजिक कार्यामध्येच पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अशातच ‘कोरोना’चा काळ सुरू झाला आणि सगळ्यांची झोप उडाली. या संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा लोक आपल्या घरांमध्ये बंदिस्त होते, तेव्हा ज्योत्स्ना यांच्यासारख्या समाजसेविका कामाला लागल्या. वैद्यकीय शिबिरे राबवून लोकांच्या टेस्ट करणे, त्यांना मास्क, सॅनिटायझर यांसारख्या सामग्रीचे वाटप करणे, गरिबांना परवडणार्या दरात धान्य देणे इत्यादी कामे त्यांनी केली. त्यांच्या समाजकार्याला कुठल्याही प्रकारचा मुलामा नव्हता, अत्यंत सहजतेने केलेले ते काम होते.
मुंबईच्या चर्मकार समाजातील गटई कामगारांना त्यांच्या कामामध्ये अडचणींचा सामना करावा लागला. अशावेळी ज्योत्स्ना लोकरे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्या या कार्याचा गौरव अनेकांनी केला. सरकार गरिबांसाठी अनेक योजना राबवत असते. परंतु, या योजनांचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणते निकष आहेत, अशी प्राथमिक माहितीच बर्याचदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि या योजनांपासून सामान्य लोक वंचित राहतात. ज्योत्स्ना लोकरेंसारख्या कार्यकर्त्या, लोकांना यासाठी मार्गदर्शन करत राहतात. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी, लेखनकार्यालाही सुरुवात केली. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल, त्या समाजमाध्यमांवर व्यक्त व्हायच्या. त्यासोबतच त्यांनी याच माध्यमातून लेख, कविता, कथा आदी गोष्टींच्या लिखाणाचा प्रारंभ केला. यानंतर ‘कौमुदी कविता मंच’ या साहित्यिक गटाच्या त्या सदस्या झाल्या. वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापर करत, त्यांनी आपले लेखन सर्वत्र पोहोचवले आहे.
समाजसेवेचे महत्त्व युवकांना सांगताना त्या म्हणतात की, “समाजसेवा म्हणजे ईश्वरसेवा आहे. आपण ज्यावेळी समाजातल्या तळागळातल्या लोकांसाठी काम करत असतो, त्यावेळी एकाप्रकारे आपण आपल्या मायभूमीचेच ऋण फेडत असतो. समाजसेवेमध्ये झोकून दिल्यावर, आपल्याला स्वतःची वेगळी ओळख होते. आपला देश इतका मोठा आहे की, इथे समाजसेवेसाठी झटणार्या कार्यकर्त्यांची खूप गरज आहे. इतरांनी लादलेले काम करण्यापेक्षा, स्वयंप्रेरणेतून समाजासाठी विधायक कामे करणारी माणसे आपला देश घडवत असतात. ही स्वयंप्रेरणाच माणसाला मोठे करते,” हा ज्योत्स्ना यांचा विश्वास आहे. त्यांच्या याच विधायक वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छ!