ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमात्मस्वरुपाचे आकलन होऊ लागते. ते स्वरुप सर्वत्र भरून राहिले आहे. त्या व्यतिरिक्त अन्य दुजेपण नाही, असे मनाला वाटू लागते. पुढे नंतर ही जाणीवही मावळल्यावर मनाची उन्मनी अवस्था होते. या तुर्यातीत अवस्थेत, शब्द किंवा भाषाही उरत नाही. सर्वत्र रामाचे दर्शन होऊ लागते, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. ही परमात्मस्वरुपाची अनुभूती येऊ लागल्यावर मन त्याला कसे सामोरे जाते, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत. ही अनुभूतीची प्रक्रिया असल्याने, मागील श्लोकातील विचाराचा हा पुढील भाग आहे, असे म्हणता येते.
कदा वोळखीमाजी दुजें दिसेना।
मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना।
बहूतां दिसां आपुली भेटि जाली।
विदेहीपणें सर्व काया निवाली॥201॥
तुर्यातीत उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यावर, मनाला भौतिक गोष्टींची आठवण राहात नाही. तेथे भाषा आणि शब्दही लय पावतात. मनाचे वेगळे अस्तित्व न राहता, तेही परमात्म स्वरुपात लुप्त होऊन जाते. परंतु, मन या विशिष्ट अवस्थेत फार काळ राहात नाही. तरीही ते पूर्वपदावर आल्यावर, त्याला परमात्मतत्त्वाशिवाय दुजेपणाने काही दिसत नाही. या अवस्थेपूर्वी, भौतिक वस्तू पाहिल्यावर त्याची प्रतिमा मनाच्या जाणिवेत उमटत होती. पण, परमात्मस्वरुपाचा अनुभव घेतल्यावर दृश्य वस्तुतील ब्रह्मतत्त्व कळाल्याने, दृश्य वस्तू मनाच्या जाणिवेत प्रवेश करीत नाही. तेथील सर्वांभूती परमात्मस्वरुप असल्याचा शोध लागल्याने, साक्षात्कारी पुरुषाच्या मनात द्वैत भावना शिल्लक राहात नाही. अशा वेळी वेगळेपणाने, त्याच्या नजरेत काही येत नाही. सर्वत्र परमात्मस्वरुप भरून राहिले असल्याचे प्रत्ययास आल्यामुळे, त्याच्या अंतरंगातील आत्मतत्त्व अर्थात परमात्मस्वरुप आणि बाह्यजगतातील भौतिक वस्तूच्या ठिकाणचे ब्रह्मतत्त्व एकच आहे, ही प्रचिती आल्यावर मनात दुजेपणाची भावना शिल्लक राहात नाही. मनाची ही अवस्था अशी असते की, फार दिवसांनी आपलीच आपल्याशी भेट झाली. याचा अर्थ असा की, आपल्या ठिकाणी असलेल्या परमात्मस्वरुपाची, परब्रह्माशी भेट झाली, जवळीक साधली गेली, असे साधकाला वाटू लागते. ही विदेही स्थिती अनुभवत असताना, त्याच्या शरीराचे भान हरपले गेल्याने त्याची काया शांत झाली, असे त्याला वाटू लागते. यापूर्वी भौतिकातील द्वैताच्या प्रभावाने मन अस्वस्थ, अशांत होते. त्याचा परिणाम या शरीरावर दिसत होता. शरीराची सहनशक्त ी कमी होऊन, त्याची दुर्बलता जाणवत होती. मानसिक अनारोग्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. यासाठी एक साधे उदाहरण सांगता येईल.
माणसाला क्रोध अनावर झाला की, त्याचे मन बेभान होते. त्याचा स्वतःवर ताबा राहात नाही. याचा शरीरावरही परिणाम झालेला दिसून येतो. त्या व्यक्त ीच्या हृदयाचे ठोके, जलद गतीने पडू लागतात. त्याची कानशिले गरम होतात. प्रसंगी सर्व शरीर अस्वस्थ झाल्याने, शरीराचा दाह जाणवतो. तथापि, द्वैतभावना संपल्यावर राग, द्वेष, मत्सर, मोह, माया मनाला स्पर्श करू शकत नाही, मन शांत होते. परिणामी, शरीरही शांत होऊन दोघेही आनंदाचा अनुभव घेतात. असा आनंद सतत मिळावा, यासाठी माणसाची सारी धडपड चाललेली असते. स्वस्वरुपाची जाणीव झाल्यावर मन देहातीत झाल्याने, ते आनंदमयी परमात्मतत्त्वात विराम पावते. त्यातून त्याला मानसिक आणि शारीरिक सौख्याचा, समाधानाचा लाभ होतो. हे समाधान बाह्य गोष्टींवर अवलंबून नसल्याने, ते कायमस्वरुपी टिकणारे असते. अशी समाधानाची स्थिती अनुभवली, तरी साधकाला आपले साधन करीत राहावे लागते. या स्वरुपाचा उपदेश स्वामींनी या पुढील तीन श्लोकांतून केला आहे. समर्थांचा साधकांसाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे. ज्ञान प्राप्त झाल्यावरही जे काही अंतर्बाह्य साधन केलेले असते, ते पुढे चालू ठेवण्यात धन्यता आहे.
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें।
परी अंतरीं पाहिजे येत्न केलें।
सदा श्रवणें पाविजे निश्चयासी।
धरीं सज्जनसंगती धन्य होसी॥202॥
श्लोकाच्या पहिल्या ओळीत स्वामी सांगतात की हे मना, तुला आता ही ब्रह्मज्ञानाची गुप्त गोष्ट अर्थात ब्रह्मज्ञानाचे रहस्य समजले आहे, प्राप्त झाले आहे. ब्रह्मज्ञानाचे हे ‘गुज’ समजावे, म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांच्या पहिल्याच श्लोकापासून ‘राघवाचा पंथ’ आचरायला सांगितला आहे. (गमूं पंथ आनंत या राघवाचा) आणि शेवटपर्यंत ‘राघवाचा पंथ’ समजावून सांगितला आहे. याचा अर्थ ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची अनुभूती कशी घेता येईल? हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी सांगितले. आत्मबुद्धीचा अभ्यास कसा करावा हे समर्थांनी मनाच्या श्लोकांत, तसेच दासबोधात सांगितले असून, त्यामागील अडचणींचा ऊहापोह केला आहे. थोडक्यात त्यासाठी देहबुद्धी, अहंकार, मीपणा सोडायला सांगितले आहे. अध्यात्मज्ञान मिळवण्याच्या मार्गातील हे मोठे अडथळे आहेत, ते ओलांडणे सामान्य माणसाला कठीण जाते. हे किती खोलवर असतात, यासाठी अहंकाराचे उदाहरण पाहू. माणसाने नीतिधर्माने वागावे. द्वेष, मत्सर, क्रोध, मोह, लालसा, वासना या विकारांना जवळही फिरकू देऊ नये. हे जरी एखाद्याला संयमाने व प्रयत्नांनी साधले, तरी आपल्या चांगल्या वागणुकीचा सूक्ष्म अहंकार त्याच्या मनात असतो, तोही नसावा. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल, तर त्याविषयी मनात शंका नसावी. त्याचा संशय घेऊ नये. या सर्व अडथळ्यांना पार करून मन जेव्हा अतीद्रिंंये परमात्मस्वरुपाचा विचार करू लागते, तेव्हा सर्वांभूती परब्रह्म दिसू लागून दुजेपण शिल्लक राहात नाही.
आत्मज्ञानाचा हा अतींद्रिय अनुभव विलक्षण असतो. त्याचे शब्दांत किंवा भाषेत वर्णन करता येत नाही. असे असले तरीही, समर्थांसारखे आत्मसाक्षात्कारी संत ते गुज म्हणजे रहस्य, तुमच्या-आमच्यासाठी शब्दांत-भाषेत व्यक्त करतात. मनाचे श्लोक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तथापि, मनाच्या श्लोकांचे नुसते वाचन किंवा पठण करून, काहीही साध्य होत नाही.आत्मज्ञान साध्य करण्यासाठी अंतःकरण सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे समर्थांचे मत आहे. नुसत्या शब्दज्ञानाने अतीद्रिंय आत्मज्ञान साधता येत नाही. स्वामी म्हणतात, ‘परी अंतरी पाहिजे येत्न केलें’ त्याचप्रमाणे, आपल्याला ब्रह्मज्ञानाचे गुज समजले या भ्रमात न राहता, संतांच्या संगतीत राहून त्यांच्याकडून आत्मज्ञान श्रवण केले पाहिजे. अशी संतसंगती केल्यावर, आत्मज्ञान प्राप्त होऊन माणूस धन्य होतो. (धरीं सज्जनसंगती धन्य होसी) आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान समजले, प्रत्ययास आले, तरी श्रवण, मनन, चिंतन, निश्चय संतसंगती, अभ्यास या साधनांचा त्याग करू नये, ती साधने सोडू नयेत. ती साधने सोडली, तर आत्मज्ञानाचा सूक्ष्म अहंकार होऊन, सारे फुकट जाईल. यासाठी साध्य प्राप्त झाले, या भ्रमात साधनांना कमी लेखू नये; ते चालूच ठेवावे, असा समर्थांचा आग्रह आहे.
सुरेश जाखडी
(क्रमशः)
7738778322