एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा
23-Apr-2025
Total Views | 7
एआयच्या मदतीने जनसंपर्कातील कामे प्रभावीपणे करा : ब्रिजेश सिंह
`पीआरएसआय`च्या वतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिवस उत्साहात साजरा
मुंबई,``आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता हे व्यवस्थापन व संवाद क्षेत्रात एक प्रभावी साधन ठरत आहे. जनसंपर्क क्षेत्र हे विश्वासावर चालते. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि चॅटजीपीटी आदीसारख्या तंत्रज्ञानांनी मोठा बदल घडवून आणला आहे. एआय, चॅटजीपीटी, कॅनव्हा आदी सगळी साधने आहेत, याचा वापर योग्यरित्या करायला शिका. या साधनांचा उपयोग करून जनसंपर्क क्षेत्रातील कामे अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत``, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभागाच्या वतीने प्रेस क्लबमध्ये आयोजिलेल्या “कृत्रिम बुध्दिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिथी वक्ते द इकॉनॉमिक टाईम्सचे कार्यकारी संपादक मुकबिल अहमर, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभागाच्या अध्यक्ष अनिता श्रीवास्तव, उपाध्यक्ष राजेश परिडा, सचिव डॉ. मिलिंद आवताडे, खजिनदार अमलान मस्कारेनहास, मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या प्रा. दैवता पाटील, जनसंपर्क आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच मुंबई विद्यापीठातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, ``जरी ‘एआय’ला मानवी भावना समजत नसल्या तरीही, भावना विश्लेषण आणि प्रतिक्रिया संकलनात त्याची कार्यक्षमता खूप आहे. तंत्रज्ञान सतत बदलतंय. जो नवीन गोष्टी शिकत राहतो, तोच टिकतो. त्यामुळे आज ‘एआय’ आहे, उद्या दुसरं काही येईल, पण तुम्ही शिकण्याची आणि जुळवून घेण्याची वृत्ती ठेवली, तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. भाषांतर करणे, लेख लिहिणे, व्हिज्युअल्स तयार करणे, अहवाल तयार करणे असो किंवा कोणत्याही भाषेत सोशल मीडियासाठी पोस्ट्स बनवणे असो ‘एआय’ लगेच करू शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अनिता श्रीवास्तव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दैवता पाटील यांनी केले, आभार डॉ. मिलिंद आवताडे यांनी मानले.